मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी रविवारी (3 डिसेंबर) राजस्थान (Rajasthan), मध्य प्रदेश (Madhya Pradesh), छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election Result) निकालांबाबत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, तुष्टीकरणाचे आणि जातीपातीचे राजकारण करण्याचे दिवस आता संपल्याचे आजच्या निवडणूक निकालांनी सिद्ध केले आहे. देशातील चार राज्यांच्या निवडणुकांच्या निकालानंतर तीन राज्यांत भाजपची सरशी झाल्याचं चित्र स्पष्ट झालं. मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपने आपल्या विजयाचा झेंडा फडकवला आहे.
अमित शाह यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. "लोकांच्या हृदयात फक्त आणि फक्त मोदीजी आहेत. नवीन भारत कामगिरीच्या राजकारणावर मत देतो. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील जनतेला या प्रचंड पाठिंब्याबद्दल मी सलाम करतो. भाजपच्या या शानदार विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे खूप खूप अभिनंदन, अशी प्रतिक्रिया अमित शाह यांनी दिली.
अमित शाह यांनी काय म्हटलं?
अमित शहा यांनी राजस्थानच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले, "वीरभूमी राजस्थानच्या लोकांचे मनापासून आभार. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपला विजयासाठी आशीर्वाद दिल्याबद्दल मी राजस्थानच्या जनतेचे अभिनंदन करतो.
पुढे त्यांनी म्हटलं की, मध्य प्रदेशचा हा मोठा विजय म्हणजे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील दुहेरी इंजिन सरकारच्या कल्याणकारी धोरणांना आणि सुशासनाला जनतेची मान्यता आहे. भाजपला प्रचंड बहुमताने आशीर्वाद देऊन सतत सेवेची संधी दिल्याबद्दल मी जनतेचे मनःपूर्वक आभार मानतो.
शाह म्हणाले की, छत्तीसगडमधील आदिवासी, गरीब आणि शेतकरी भगिनी आणि बांधवांनी पंतप्रधान मोदींवर विश्वास व्यक्त करून भाजपला प्रचंड बहुमताचा आशीर्वाद दिला आहे. या प्रचंड विजयाबद्दल मी छत्तीसगडच्या जनतेचे आभार मानतो.
तेलंगणाविषयी काय म्हटलं?
अमित शाह म्हणाले की, तेलंगणातील लोकांच्या उत्स्फूर्त पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप तेलंगणाच्या विकासासाठी काम करत राहील. जनतेच्या सहकार्याने आम्ही तेलंगणाला नक्कीच समृद्ध राज्य बनवू.