मुंबई : चार राज्यांच्या रणसंग्रामात तीन राज्ये खिशात घालून भाजपने पुन्हा एकदा वर्चस्व (Assembly Election Result) सिद्ध केलं आहे. हिंदी बेल्टमधील तीनही राज्यांमध्ये भाजपने विजय प्राप्त करून लोकसभेसाठी आपण तयार असल्याचा संदेशही दिला आहे. या निकालांचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार असून राज्यातही भाजप सत्तेवर येईल असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) केला. भाजपच्या या विजयाचं श्रेय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (J.P. Nadda) यांना दिलं. 


लोकांच्या मनात केवळ मोदीजी असून या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनी मोदींवरील विश्वास व्यक्त केल्याचं फडणवीस म्हणाले. ते म्हणाले की, आजच्या निकालांचा कल पाहता येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीतही भाजप विजयी होईल यात शंका नाही. एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीला लोकांनी नाकारले आहे, त्यांच्या अजेंड्यालाही लोकांनी नाकारलं आहे. लोकांच्या मनामध्ये केवळ मोदीजी आहेत. 


भाजपच्या राष्ट्रीय टीमचे आभार


या निवडणुकीच्या यशात भाजपच्या राष्ट्रीय टीमचा मोठा हात असल्याचं सांगत देवेंद्र फडणवीसांनी त्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, राष्ट्रीय अध्यक्ष आणि  त्या त्या राज्यातली जी काही भाजपची टीम आहे आणि आमची राष्ट्रीय टीम आहे या सगळ्यांचं हे श्रेय आहे आणि म्हणून या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. भारतीय जनता पक्षाची मतं  दहा टक्केपेक्षा देखील जास्त वाढलेली आहे आणि विशेषतः छत्तीसगड राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात ही टक्केवारी आहे. मध्य प्रदेशमध्ये आठ टक्क्यानी वाढली. 


भाजपच्या मतांमध्ये दहा टक्क्यांची वाढ


भाजपच्या मतांमध्ये दहा टक्क्यांची वाढ झाल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस म्हणाला की, छत्तीसगडमध्ये भाजपच्या मतांमध्ये जवळपास 14 टक्के मतं वाढली. राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली, मध्य प्रदेश मध्ये आठ टक्क्याने मतं वाढली. तेलंगाना मध्ये देखील जवळपास दहा टक्क्यांनी मत वाढलेली आहेत. त्यामुळे एकूणच सगळीकडे मोठ्या प्रमाणात जनतेचा विश्वास हा भारतीय जनता पक्षावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो.


पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडणार


विरोधक आता त्यांच्या पराभवाचे खापर हे ईव्हीएमवर फोडणार असल्याचा दावा फडणवीसांनी केला. ते म्हणाले की, विरोधकांनी कोणावरही खापर फोडलं तरी देखील जनता ही मोदीजींच्या पाठीशी आहे. मला हे देखील नमूद केलं पाहिजे. हीच परिस्थिती महाराष्ट्रात देखील आहे, महाराष्ट्रामध्ये नुकत्याच ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं दोन तृतीअंश ग्रामपंचायती आमच्या महायुतीने जिंकल्या. लोकसभेमध्येही तेच आपल्याला पाहायला मिळेल. जो विकास आणि विश्वास मोदीजींनी तयार केला आहे, डबल इंजिन सरकारने तयार केला आहे, त्याच्या आधारावर मला विश्वास आहे पुन्हा एकदा महाराष्ट्रात आणि देशात भारतीय जनताच पाहायला मिळेल.


ही बातमी वाचा: