आंबेगाव : आंबेगाव विधानसभा मतदार संघावर विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटलांचा दबदबा आहे. 1990 ते 2019 या 29 वर्षाच्या कालखंडात ते अखंड आमदार राहिले आहेत. सुरुवातीला काँग्रेस अन नंतर शरद पवारांनी स्थापन केलेली राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षातून मिळून सलग सहा वेळा आमदार होण्याचा बहुमान वळसे-पाटलांच्या नावे आहे. वळसे-पाटलांचा हा बोलबाला गेली तीन लोकसभेत मात्र थंडावायचा अन शिवसेनेच्या पारड्यात ती मतं झुकायची. कारण लोकसभेत शिवसेना शिवाजी आढळरावांच्या रूपाने आंबेगाव विधानसभेतील भूमिपुत्र उमेदवार दिला जायचा. पण यंदाच्या लोकसभेत राष्ट्रवादीनं अमोल कोल्हेंना पत्ता खेळत भूमिपुत्र आढळरावांच्या खासदारकीचा पत्ता कापला अन् त्यांना गडातच रोखलं. या सुखद धक्क्यात दिलीप वळसे-पाटील विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. शिवसेनेकडून त्यांच्या विरोधात लोकसभेत पराभूत झालेले आढळराव स्वतः किंवा कुटुंबातील सदस्य ते उभा करण्याची शक्यता आहे.
आंबेगाव विधानसभा मतदार संघ हा पुणे-नाशिक महामार्गाच्या दुतर्फा पसरला आहे. हुतात्मा बाबू गेनू सैद यांचं जनस्थळ, बारा जोतिर्लिंगांपैकी एक भीमाशंकर हे तीर्थक्षेत्र या मतदारसंघाचा भाग आहे. शेतकरी मोठ्या संख्येने असणाऱ्या या मतदार संघात आदिवासी बहुल समाज ही लक्षणीय आहे. पाच वर्षांपूर्वी डोंगराने गडप केलेलं माळीण गाव याच मतदारसंघाचा घटक आहे. मतदारसंघातील मंचर शहर हे झपाट्याने वाढत असतानाच विकास मात्र त्या मानाने होताना दिसत नाहीये.
2004, 2009, 2014 च्या शिरूर लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार शिवाजी आढळराव हे भूमिपुत्र होते. म्हणूनच आंबेगाव विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप वळसे-पाटील असताना ही मतदार आढळरावांच्या पारड्यात जोमाने मतं टाकायचे. म्हणूनच दिल्लीत शिवाजी आढळराव अन मुंबईत दिलीप वळसे-पाटील असं दोघांमध्ये साटंलोटं झाल्याच्या चर्चेला ऊत आला होता. अशातच शरद पवारांनी शिवबंधन तोडून अमोल कोल्हेंना मनगटावर घड्याळ घालायला लावलं आणि तेच शिरूर लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढतील हे जाहीर केलं. तेंव्हा पहिल्याच सभेत आढळराव आणि वळसे-पाटील यांच्यात साटंलोटं असल्याच्या चर्चेवर वळसे-पाटलांनी जाहीर भाष्य केलं. चर्चेची ही सल अंतर्मनात खोलवर असल्याचं त्यांच्या वक्तव्यातून सर्वांना जाणवलं, ते भावुकही झाले. पवार साहेबांचा सच्चा कार्यकर्ता असल्याचा दाखला त्यांना द्यावा लागला. यातून वळसे-पाटलांना मिळालेली सहानुभूती आणि अमोल कोल्हेंचा प्रभाव यामुळं आंबेगाव विधानसभेतून 25 हजार 697 मतांनी राष्ट्रवादीला आघाडी मिळाली. परिणामी भूमिपुत्र शिवाजी आढळरावांचा चौकार गडातच रोखला गेला.
या सुखद धक्क्यात दिलीप वळसे-पाटील यंदाच्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. 1990 ते 2019 या 29 वर्षाच्या कालखंडात अखंड आमदार राहिलेले वळसे-पाटील आता सातव्यांदा विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. 2009 ला शिवाजी आढळराव यांच्या पत्नी कल्पना आढळराव तर 2019 मध्ये सेनेच्या अरुण गिरे यांच्यावर वळसे-पाटलांनी एकहाती विजय मिळवले आहेत. पण यंदा लोकसभेच्या पराभवाची सल दूर करण्यासाठी स्वतः शिवाजी आढळराव हे वळसे-पाटलांसोबत दोन हात करण्याची शक्यता आहे. तसं झालंच नाही तर आढळरावांच्या पत्नी कल्पना दुसऱ्यांदा अथवा मुलगा अक्षय पहिल्यांदा नशीब अजमावू शकतात. त्यामुळं इथे राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होईल, हे नक्की.
2019 च्या शिरूर लोकसभेतील आंबेगाव विधानसभेत पक्षनिहाय मिळालेली मतं
शिवाजीराव आढळराव (शिवसेना) - 82 हजार 084
डॉ अमोल कोल्हे (राष्ट्रवादी काँग्रेस) - 1 लक्ष 7 हजार 781 (विजयी)
आंबेगाव विधानसभा | वळसे पाटलांसमोर आढळराव पाटलांचं आव्हान
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Aug 2019 12:57 PM (IST)
पवार साहेबांचा सच्चा कार्यकर्ता असल्याचा दाखला त्यांना द्यावा लागला. यातून वळसे-पाटलांना मिळालेली सहानुभूती आणि अमोल कोल्हेंचा प्रभाव यामुळं आंबेगाव विधानसभेतून 25 हजार 697 मतांनी राष्ट्रवादीला आघाडी मिळाली. परिणामी भूमिपुत्र शिवाजी आढळरावांचा चौकार गडातच रोखला गेला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -