Maharashtra Politics: राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर महायुतीला २३६ जागा जिंकता आल्या, यात भाजप १३२, शिवसेना शिंदे गट ५७ राष्ट्रवादी ४१ तर इतर ६ जागांच्या विजयाचं गणित होतं. राज्यात यंदा अनेक ठिकाणी शिंदे विरुद्ध ठाकरे अशी लढत होती. यात ज्या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले याची कारणमिमांसा आता शिवसेनेकडून शोधली जाणार आहे.शिवसेना नेत्यांच्या बैठकित विधानसभा निवडणूकींचा आढावा घेण्यात आला.वर्षा बंगल्यावर नुकत्याच झालेल्या या बैठकित शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव आढसूळ, रामदास कदम, दादा भूसे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
पराभवाच्या कारणांचा अहवाल शिंदेंना देण्याच्या सूचना
उमेदवारांनी या पराभवातून खचून न जाता, त्यामागची कारणं शोधावी. नेमकं का पराभव झाला आपण कुठे कमी पडलो, महायुतीचा धर्म पाळला गेला का ? पक्षांतर्गत नेते पदाधिकारी या पराभवाला कारणीभूत आहेत का ? याचा अहवाल बनवून मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्याच्या सूचना पराभूत उमेदवारांना करण्यात आल्या आहेत.या सूचना लक्षात घेऊन पुढील निवडणूकांमध्ये या चूका टाळून पक्षाकडून यशस्वी नियोजन केले जाईल असेही या बैठकीत सांगण्यात आले आहे.
युतीधर्म पाळला न गेल्यास...
या बैठकीत पराभूत उमेदवारांकडून युतीधर्म पाळला गेला नसल्यास त्या संदर्भात कडक पावले उचलली जातील, असं सांगण्यात आलंय.तर पक्षांतर्गत वादातून काही प्रकार घडला गेला असल्यास तसे अहवालात पुरावे स्पष्ट झाल्यास दोषींविरोधातही फास आवळला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वरिष्ठ मंत्र्यांवर वर्चस्वाच्या लढाईत विरोधात काम केल्याचा संशय
काही वरिष्ठ मंत्र्यांनी जिल्ह्यातील वर्चस्वाच्या लढाईतून पक्षाच्या उमेदवारा विरोधातच काम केल्याचा संशय शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांना आहे.आता पराभूत उमेदवारांच्या अहवालातून पराभवाची नेमकी काय कारणे आहेत. हे समोर आल्यानंतर पक्षाकडून काय निर्णय घेतले जातात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अमित शाह, नरेंद्र मोदींच्या निर्णयाला आमच्या पक्षाचा पाठिंबा- एकनाथ शिंदे
अमित शाह, नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील त्याला आमच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. महायुतीचा जो उमेदवार असेल त्याला पाठिंबा द्यायला मी इथे उभा आहे, एकनाथ शिंदेंनी स्पष्टपणे सांगितले. कुठही घोडं अडलेलं नाही. मी कुठेही काही अडून धरलेलं नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही नाराज वगैरे नाही, आम्ही नाराज होणारे नाही लढणारे लोक आहोत. एवढा मोठा विजय मिळाला, आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय असा ऐताहासिक विजय असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितले.