Sukhbir Singh Badal:पंजाबचे शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख व माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांना धक्का बसला आहे. अकाली दलाची सत्ता असताना घेतलेल्या चुकीच्या निर्णयांबद्दल अकाल तख्तने बादल यांच्यासह तत्कालीन मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांना दोषी धरत शिक्षा सुनावली आहे. दोन महिन्यांपूर्वीच याबाबतची घोषणा करण्यात आली होती. अकाल तख्तचे जत्थेदार ज्ञानी रघुबीर सिंह यांनी सोमवारी दुपारी शिक्षा जाहीर केली. त्यानुसार सुखबीर बादल यांच्यासह 2015 च्या कॅबिनेटमधील सदस्यांना सुवर्ण मंदिरातील बाथरुम स्वच्छ करण्याची, खरकटी भांडी घासण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यांसह त्यांना धार्मिक दंडही ठोठावण्यात आला आहे.
पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
बादल यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा तीन दिवसांत स्वीकारण्याची सुचनाही अकाल तख्तने केली आहे.अकाली दलाच्या कार्य समितीने सदस्यता अभियान सुरू करून सहा महिन्यांत नवीन अध्यक्षांची निवड करण्याचे निर्देशही दिले आहेत.
वादग्रस्त गुरमीत राम रहीम प्रकरण काय?
अकाली दलाचे सरकार असताना वादग्रस्त डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम यांना माफी देण्यात आली होती. हा निर्णय चुकीचा असल्याचा ठपका ठेवत अकाल तख्तने माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांना देण्यात आलेली ‘फकर-ए-कौम’ ही उपाधीही परत घेतली आहे.
गुरमीत राम रहीम याने 2007 मध्ये गोविंद सिंह यांच्याप्रमाणेच वेशभूषा केली होती. त्यानंतर त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पण अकाली सरकारने गुरमीत राम रहीमला शिक्षा देण्याऐवजी दाखल गुन्हा मागे घेतला होता. अकाल तख्त साहिबने राम रहीमवर शीख पंथातून काढले होते. सुखबीर सिंह बादल यांनी आपल्या पदाचा वापर करून राम रहीमला माफी मिळवून दिली होती. त्यानंतर अकाली दलाविरुध्द नाराजी वाढली होती. त्यानंतर अकाल तख्तने राम रहीमला माफीचा निर्णय मागे घेतला होता.
चूक मान्य केली, ३ डिसेंबरपासून शिक्षा
सुखबीर सिंह यांनी काही दिवसांपूर्वीच आपली चूक मान्य केली होती. त्यांनी म्हटले होते की, ‘आमच्याकडून अनेक चुका झाल्या आहेत. आम्ही दोषींना शिक्षा देण्यात अपयशी ठरलो.’ त्यानंतर अकाल तख्तने त्यांना दोषी ठरवले होते. दरम्यान, बादल यांच्यासह इतरांना देण्यात आलेल्या शिक्षेची अंमलबजावणी 3 डिसेंबरपासून होणार आहे.
मंदिरातील बाथरुम स्वच्छता, खरकटी भांडी घासणे...
दररोज दुपारी 12 ते 1 या वेळेत सुवर्ण मंदिरातील बाथरुमची स्वच्छता करणे, त्यानंतर लंगर हॉलमध्ये एक तास खरकटी भांडी घासणे, एक तास कीर्तन करणे, अशी शिक्षा आहे. सुपर्ण मंदिरात दोन दिवसांत आणि त्यानंतर केसगढ साहिब, दमदमा साहिब, मुक्तसर साहिब आणि फेतहगढ साहिब येथे प्रत्येक दोन दिवस सेवा करावी लागणार आहे. त्यानंतर त्यांची शिक्षा पूर्ण होईल.