सोलापूर: राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये महायुती आघाडीने मोठ्या प्रमाणावर यश मिळवलं. तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकासआघाडी नको अशी भूमिका शिवसेना ठाकरे गट घेत असल्याच्या चर्चा काही दिवस सुरू होत्या. मात्र, आता विधानसभा निवडणुकीत मित्र पक्षांनीच पाठीत वार केला आहे, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी नको. सोलापुरातील महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढवण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
सोलापूर दक्षिण विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा पराभव झाल्यानंतर जिल्हाप्रमुख अजय दासरी आक्रमक झाले आहेत. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्यावर शिवसेना ठाकरे गट आग्रही असल्याचं देखील दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतः खासदार प्रणिती शिंदे यांना आवाहन करूनही त्यांनी आघाडीधर्म पाळला नाही. त्यामुळे आगामी काळातील सर्व निवडणुका स्वबळावर लढवाव्या असा अहवाल आम्ही पक्षप्रमुखांना दिला आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आमच्या उमेदवाराचे काम केले नाही असा आमचा देखील आरोप आहे, त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
प्रणिती शिंदेंनी आघाडीधर्म पाळला नाही
सोलापूर दक्षिणमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचा उमेदवार देऊनही प्रणिती शिंदे यांनी काडादींना पाठिंबा दिला. त्यावेळी बोलताना त्या म्हणाल्या होत्या. सोलापूर दक्षिण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. आघाडीधर्म आम्ही पाळला. आम्ही शेवटच्या क्षणी एबी फॉर्म मागे घेतला. दिलीप माने यांनीही आपला एबी फॉर्म मागे घेतला. पण आम्हाला इथे फ्रेंडली फाईट हवी होती, पण ती होऊ शकली नाही. त्यावेळी काहीतरी गैरसमज झाला. संजय राऊत यांनी यादीत काही बदल होईल असं सांगितलं होतं. त्यामुळं आम्हाला वाटलं होतं की सोलापूर दक्षिणची जागा ठाकरे गटानं चुकून जाहीर केलीय. पण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळं आज आम्ही काडादी यांच्या सोबत आहोत. अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्यात, त्यामुळं जो जितेगा वही सिकंदर होगा. आम्ही एबी फॉर्म नाही दिला कारण काँग्रेसला आघाडी धर्म पाळायचा होता, असे मत खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले.
त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी नको. सोलापुरातील महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढवण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.