Akot Assembly constituency 2024: अकोट विधानसभा मतदारसंघ... अकोला जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच महत्वाची भूमिका बजावणारा मतदारसंघ... या मतदारसंघात अकोट आणि तेल्हारा या दोन तालुक्यांचा समावेश होतोय. या मतदारसंघात तब्बल 3 लाख 10 हजार 88 मतदार आहेयेत. अकोला जिल्ह्यातील 'अकोट विधानसभा मतदारसंघ आपल्या एका 'खास' वैशिष्ट्यासाठी. या मतदारसंघात एकदा निवडून आलेला 'आमदार' परत दुसऱ्यांदा निवडून येत नाही. या मतदारसंघानं 1985 पासून आपला हा अलिखित नियम अगदी कसोशीनं पाळला आहे. मात्र, 2014 आणि 2019 असे सलग दोनदा भाजपचे प्रकाश भारसाकळे विजयी झाले आहेत. 2014 पर्यंत युतीमध्ये शिवसेनेच्या ताब्यात हा मतदारसंघ होता. 2009 मध्ये येथून शिवसेनेचे संजय गावंडे विजयी झाले होते. मात्र, 2014 मध्ये युती तुटली आणि हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात गेला.
या मतदारसंघात मराठा आणि कुणबी समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्याखालोखाल दलित आणि मुस्लिम समाजाचा मतदार येथे आहेय. यासोबतच बारी, भोई, धनगर, आदिवासी, माळी, कोळी आणि इतर छोटे समाज या मतदारसंघात आहेयेत. लोकसभेत येथून भाजपला 9168 हजार मतांची आघाडी आहेय.
अकोट मतदारसंघात 2019 मध्ये पहिल्या तीन उमेदवारांना मिळालेली मते
भाजपाचे प्रकाश भारसाकळे 7,260 मतांनी विजयी
उमेदवार पक्ष मते
प्रकाश भारसाकळे भाजप 48586
संतोष रहाटे वंचित 41326
अनिल गावंडे अपक्ष 28183
अकोट मतदारसंघातील एकूण मतदार संख्या :
स्त्री : 149214
पुरूष : 160873
तृतीयपंंथी :01
एकूण : 310088
अकोटमध्ये इच्छुकांची गर्दी
भाजपकडून आमदार प्रकाश भारसाकळे, कनक कोटक, विशाल गणगणे, डॉ.रणजित पाटील (माजी राज्यमंत्री), जयश्री पुंडकर, कॅप्ट.सुनील डोबाळे, पुरुषोत्तम चौखंडे, काँग्रेसकडून प्रशांत पाचडे, ॲड. महेश गणगणे, संजय बोडखे, निनाद मानकर, प्रहार जनशक्ती पक्षाकडून अनिल गावंडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून कैलास गोंडचर, राजू बोचे, शिवसेना उबाठा पक्षाकडून रामप्रभु तराळे, माजी आमदार संजय गावंडे, दिलीप बोचे, डॉ.मनीषा मते (मा.नगराध्यक्ष), माया ताई म्हैसने, शिवा मोहोड, शिवसेना शिंदे गटाकडून गोपीकिशन बाजोरिया (माजी आमदार), मनीष कराळे, वंचित बहुजन आघाडीकडून दीपक बोडखे (माजी राज्यमंत्री रामदास बोडखे सुपूत्र), ॲड गजानन पुंडकर, अॅड. संतोष रहाटे, प्रदीप चोरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शेख निसार, अॅड.नंदकिशोर शेळके, अॅड. रविंद्र फाटे हे इच्छुक आहेत.
येथील स्थानिक आमदाराच्या विरोधात जनता आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी भाजपच्या चिंतेत भर टाकणारी आहे. भाजपकडून विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांनी परत रिंगणात उतरण्याबद्दल मोठी साशंकता आहे. भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात ही जागा 'रेड झोन'मध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. उमेदवार बदलायचा निर्णय झाल्यास उमेदवारीच्या रांगेत भाजपाचे अनेक नेते आहेत. संजय धोत्रे येथून त्यांचे जवळचे नातेवाईक असणाऱ्या डॉ. रणजित सपकाळ यांचं नाव समोर करण्याची दाट शक्यता आहे. भाजपाच्या इतर प्रमुख दावेदारांमध्ये अकोटचे माजी नगराध्यक्ष पुरूषोत्तम चौखंडे, तेल्हारा शहराच्या माजी नगराध्यक्षा जयश्री पुंडकर, राजेश नागमते यांची नावे चर्चेत आहेत.
भाजपच्या ताब्यात असलेल्या अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघावरून महायुतीतल्या तिन्ही पक्षात कलगीतुरा रंगला. या मतदारसंघातून लढण्याची इच्छा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी व्यक्त केलीये. तर शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरियांनीही अकोटमधून उमेदवारीसाठी शड्डू ठोकला आहे.महाविकास आघाडीत जर ठाकरे गटाला हा मतदारसंघ सुटल्यास माजी आमदार संजय गावंडे यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. याशिवाय शिवा मोहोड, माया म्हैसने, विजय दुतोंडे आणि दिलीप बोचे हेसुद्धा उमेदवारीच्या शर्यतीत आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून या मतदारसंघाचे माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे इच्छूक आहेत. तर काँग्रेसला हा मतदारसंघ सुटल्यास माजी राज्यमंत्री सुधाकरराव गणगणे यांचा मुलगा आणि युवानेते महेश गणगणे, जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, महिला नेत्या डॉ. संजीवनी बिहाडे, तालुकाध्यक्ष प्रशांत पाचडे, सहकार नेते हिदायत पटेल, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब बोंद्रे आणि जिल्हा परिषद सदस्य गजानन काकड शर्यतीत आहेत.
या मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांची मोठी ताकद आहे. वंचितकडून मागचे पराभूत उमेदवार संतोष रहाटे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष रौंदळे, माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या वाघोडे, जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे, काशिराम साबळे यांचाही वंचितच्या उमेदवारीवर दावा आहे. या मतदारसंघात प्रस्थापित राजकीय पक्षांबरोबरच दोन उमेदवारांच्या संभाव्य उमेदवारीचीही मोठी चर्चा आणि उत्सुकता आहे. यामध्ये शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे, प्रहारचे प्रमुख प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांचा समावेश आहे. तसे हा मतदारसंघ अतिशय गुंतागुंतीचा आणि विकासापासून कोसो दूर असलेला आहेय. या मतदारसंघातील महत्वाच्या समस्या तशाच असतांना आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने सकारात्मक प्रयत्न केलेले दिसून येत नाहीय.