अकोल्यात मागील अनेक दिवसांपासून तिकीटासाठी संघर्ष सुरु आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत संजय धोत्रे यांचा मोठा विजय झाला होता. मात्र सध्या अकोल्यात भाजप नेते रणजीत पाटील आणि संजय धोत्रे असे दोन गट भाजपमध्ये पडले आहेत. त्यामुळे विकासकामं रखडली आहेत. त्याचा ठपका संजय धोत्रेंवर ठेवला जात आहे. त्यामुळे संजय धोत्रे यांचं तिकीट कापणार असल्याची चर्चा अकोल्यात आहे. त्याच तणावातून त्यांना काल रात्री हृदयविकाराचा झटका आला असून रुग्णालयात दाखल केल्याचं वृत्त पसरलं होतं.
यानंतर स्वत: संजय धोत्रे यांनी प्रकृतीविषयी माहिती देत आपण ठणठणीत असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, "गेल्या 15-20 दिवसात माझा प्रवास जास्त झाला. दगदग झाल्यामुळे सर्व्हायकल स्पाँडिलायसिसचा त्रास वाढला. त्यामुळे माझ्या मानेच्या डाव्या बाजूला आणि डावा हात दुखत होता. डॉक्टरांनी सावधगिरीचा उपाय म्हणून अँजिओग्राफी करण्यास सांगितलं. त्यात काहीही निघालं नाही. त्यामुळे मी दिवस आराम करावा लागेल म्हणून मी रुग्णालयात असून आजच डिस्चार्ज मिळेल."
"पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, वरिष्ठ नेते यांना सांगू इच्छितो, की माझी प्रकृती एकदम चांगली आहे. येत्या निवडणुकीत मी माझा प्रचार तर करणार आहे, पण पक्षाचाही प्रचार करणार आहे. अशा बातम्या व्हायरल झाल्यानंतर चिंता करणं स्वाभाविक आहे. पण तुम्ही चिंता करु नका, तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत असल्यामुळे मला कोणत्याही प्रकारचा आजार किंवा काही होऊ शकत नाही. आपल्या प्रेमामुळे मी नेहमीच आनंदी असतो. काही लोकांना हा विरंगुळा झाला आहे. त्यामुळे त्यांना कदाचित दु:ख होईल हे ऐकून. ," असं आवाहनही खासदार संजय धोत्रे यांनी केलं आहे," असंही धोत्रे यांनी सांगितलं.