मुंबई: लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागला आणि त्यामध्ये अनेकांना धक्के बसले. यात अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीला केवळ 1 जागेवरच समाधान मानावे लागले. अजित पवार यांनी कोणतीही आपली भूमिका अद्याप जाहीर न केल्यामुळे त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. 


महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्यामुळे पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्याकडून पक्षाचे वरिष्ठ नेते आणि आमदार यांच्याकडून आढावा घेणं सुरु आहे. या माध्यमातून निवडणुकीत पक्षाचं नेमकं काय चूकलं याचा आढावा अजित पवार यांच्यावतीने घेतला जात आहे.


अजित पवारांची कोणतीही प्रतिक्रिया नाही


लोकसभेचे निकाल लागल्यानंतर अजित पवार यांनी केवळ एका ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला मिळालेल्या अपयशाचं विश्लेषण केलं जाईल असं म्हंटलं आह. मात्र त्यांनी अद्याप समोर येऊन कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. निकालानंतर आज पहिल्यांदा ते आमदारांशी संवाद साधताना माध्यमांसमोर येण्याची शक्यता आहे. 


सध्या अजित पवार पराभवाची कारणे समजून घेत असताना आमदारांमध्ये मात्र पक्षाच्या लोकसभेतील पराभवामुळे धाकधूक वाढल्याचं पाहायला मिळत आहे. संविधान बदल, मराठा ओबीसी आरक्षण प्रश्न यामुळे लोकांच्या रोषाला सामोरे जावं लागत असल्याचं आमदारांचं म्हणणं आहे. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाण्याचा काही आमदारांचा मानस असल्याचं बोललं जात आहे. यावर आमदार रोहित पवार यांनी 10 ते 12 आमदार आमच्या संपर्कात आहेत म्हणत शिक्कामोर्तब केलं आहे
 
अजित पवार यांनी मात्र नुकतंच दिल्लीत प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून पक्षाचा पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच ते एनडीएच्या बैठकीला आणि पंतप्रधान मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी काळात महायुतीसोबत राहणार असल्याचा त्यांनी मानस केला असला तरी आमदारांची मने अजित पवार कशी वळवणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. 


शरद पवारांच्या राष्ट्रवादीला या लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळालं. शरद पवारांच्या 10 उमेदवारांपैकी 8 उमेदवार निवडून आले. तर अजित पवारांचा एक उमेदवार निवडून आला. त्यामुळे शरद पवारांचं वाढतं महत्त्व पाहता अजित पवारांच्या आमदारांकडून पुन्हा एकदा विधानसभा मतदारसंघातील जनमताचा कौल घेतला जाणार


ही बातमी वाचा: