मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीचा दारुण पराभव झाल्यानंतर सत्ताधारी आघाडीतून काही आमदार आणि नेते बाहेर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा धोका ओळखून  अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) येत्या 15 दिवसांमध्ये राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. सध्या अजित पवारांच्या (Ajit Pawar) मुंबईतील देवगिरी या बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीनंतर राष्ट्रवादीकडून महायुतीमधील शिंदे गट आणि भाजप (BJP) यांच्यासमोर मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रस्ताव मांडला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


अजित पवार गटाच्या मुंबईतील बैठकीत लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा केली जात आहे. यामध्ये नेते आपापले विचार मांडत आहेत. लोकसभेतील पराभवाला पक्षांतर्गत नाराजी हे कारण असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. राज्यात सत्ता आल्यानंतर नेते आणि कार्यकर्ते यांना खुश ठेवायला पाहिजे होते. त्या अनुषंगाने राज्यात मंत्रिमंडळ विस्तार करावा. महामंडळांचे वाटप झाले पाहिजे. कार्यकर्ते आणि नेत्यांना स्थिर ठेवायचं असेल तर याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असा मतप्रवाह अजितदादा गटाच्या नेत्यांमध्ये आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी होऊन एक वर्ष झाले तरी अद्याप नव्याने मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. अजूनही राष्ट्रवादीच्या कोट्यातली कॅबिनेट खाते रिक्त आहे. आता शिंदे गटाचे मंत्री संदिपान भुमरे हे छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे त्यांचे मंत्रीपद रिक्त झाले आहे. येत्या 15 दिवसांमध्ये शपथविधी आयोजित करुन हे मंत्रीपद भरा. तसेच इतर खात्याच्या राज्यमंत्रीपदांचेही वाटप करा, अशी मागणी अजितदादा गटाकडून करण्यात येणार आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.


फडणवीस दिल्लीत, मुंबईत अजितदादा गट आणि शिंदे गटाच्या बैठका


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडून पक्षसंघटनेसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. देवेंद्र फडणवीस यांना या निर्णयापासून परावृत्त करण्यासाठी राज्यातील भाजप नेत्यांचे प्रयत्न सुरु आहेत. अशातच देवेंद्र फडणवीस आज नागपूरमार्गे दिल्लीकडे रवाना होणार आहेत. दिल्लीत त्यांचा एक दिवस मुक्काम असेल. या काळात देवेंद्र फडणवीस हे अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या भेटीत अमित शाह फडणवीसांची समजूत घालण्यात यशस्वी ठरणार का, हे पाहावे लागेल.


तर दुसरीकडे आज अजित पवार गटापाठोपाठ शिवसेना खासदारांची वर्षा बंगल्यावर बैठक होणार आहे. यानंतर एकनाथ शिंदे खासदारांसह दिल्लीकडे रवाना होतील. त्यामुळे या बैठकीत काय घडणार, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत. 


आणखी वाचा


अजित पवारांच्या बैठकीला कोण कोण उपस्थित, कुणाकुणाची दांडी?