मुंबई: दाऊदच्या हस्तकाशी आर्थिक व्यवहार केल्याचा ठपका असणारे अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांना उमेदवारी देण्याच्या मुद्द्यावरुन सध्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. भाजपचा विरोध असतानाही अजित पवार (Ajit Pawar) यांनी नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा एबी फॉर्म दिला होता. यानंतर भाजपच्या वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या पार्श्वभूमीवर एबीपीच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी नवाब मलिक (Nawab Malik) यांचा भक्कमपणे बचाव केला.
नवाब मलिकांना असणाऱ्या भाजपच्या विरोधाबाबत प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी म्हटले की, शेवटी प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार असतो. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर कोणतेही प्रश्न उपस्थित होणार नाही, एवढं मी सांगतो. नवाब मलिक यांच्यावर वेगवेगळे आरोप झाले आहेत. महाराष्ट्रात अनेक लोकांवर वेगवेगळे आरोप झाले आहेत, माझ्यावरही आरोप झाले आहेत. कधीकधी एखादी व्यक्ती पुढे जात असेल तर त्याला बदनाम करण्यासाठी प्रयत्न होता. राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले, त्यांना प्रचंड बहुमत मिळाले, तेव्हादेखील असे प्रयत्न झाले. काही व्यक्तींच्याबाबत त्यांची इमेज डॅमेज केल्याशिवाय पुढे जाता येत नाही, असा प्रकार असतो.
एखादा नरेटिव्ह सेट करताना तेच तेच बोलून, त्याला बदनाम केले जाते. सातत्याने अशी गोबेल्स निती वापरली की लोकांचही मतपरिवर्तन होते. अनेक लोकांवर आरोप होतात. त्यामुळे नवाब मलिक यांच्यावर केवळ आरोप होणे ही वेगळी गोष्ट आहे आणि ते आरोप सिद्ध होऊन शिक्षा होणे, ही वेगळी गोष्ट आहे. नवाब मलिक यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही, हे आमचे मत आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
नवाब मलिकांनी शिवाजीनगर-मानखुर्द मतदारसंघातून भरला उमेदवारी अर्ज
नवाब मलिक यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवाजीनगर-मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. नवाब मलिक घरातून उमेदवारी अर्ज भरायला निघाले तेव्हा त्यांच्याकडे राष्ट्रवादीचा एबी फॉर्म नव्हता. मात्र, मलिकांनी वेळ पडल्यास अपक्ष लढायचे, असा चंग बांधला होता. अखेर शेवटच्या क्षणी नवाब मलिक यांना अजितदादा गटाकडून एबी फॉर्म पाठवण्यात आला आणि त्यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी याप्रकरणाचा पाठपुरावा केला होता. त्यामुळे आता नवाब मलिक यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज मागे न घेतल्यास देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे इतर नेते काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आणखी वाचा
काका पुतण्या एकत्र येणार का ? दादा म्हणाले मी ज्योतिष नाही, राजकारणात काहीही होऊ शकतं