Ajit Pawar Maharashtra Goverment: गृहखात्यावरून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात चढाओढ सुरू आहे तर तिकडे आपल्या पदरात महत्त्वाची खाती पडावी म्हणून अजित पवार (Ajit Pawar) गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत होते. अजित पवार यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीत गेल्याची माहिती समोर आली होती. मात्र अजित पवार आणि अमित शाह यांची भेट न झाल्याने राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीवर प्रश्नचिन्ह कायम आहे.
दोन दिवसांच्या दिल्ली मुक्कामानंतरही अजित पवारांची अमित शाह (Ajit Pawar-Amit Shah Meet) यांची भेट झाली नाही. त्यामुळे आज भेट न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, सुनेत्रा पवार, पार्थ पवार देखील मुंबईकडे रवाना झाले आहे. दरम्यान, आज महायुतीच्या तिन्ही नेत्यांची होणार आहे मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे.
अजित पवार गटाचे संभाव्य मंत्री कोण?
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंत्रिपदी ज्यांची वर्णी लागू शकते त्या नेत्यांची नाव एबीपी माझाच्या हाती लागली आहेत. आदिती तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद कायम राहणार असल्याचं कळतंय. तर दत्ता भरणे, नरहरी झिरवाळ, संजय बनसोडे, इंद्रनील नाईक, संग्राम जगताप आणि सुनील शेळके यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते. दरम्यान, राष्ट्रवादीला राज्य सरकारमध्ये 7 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री पदं हवी असल्याची सूत्रांची माहिती आहे. याशिवाय प्रफुल पटेलांसाठी केंद्र सरकारमध्ये एक कॅबिनेट पद, तसंच पक्षातील वरिष्ठ नेत्यासाठी राज्यपाल पदाचीही मागणी असल्याची माहिती आहे.
महायुतीचा उद्या मुंबईत शपथविधी-
मुंबईच्या आझाद मैदानात 5 नोव्हेंबरला होणाऱ्या महायुतीच्या शपतविधीसाठी मुंबई पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त राहणार आहे. शपथविधी सोहळ्या दरम्यान होणारी गर्दी लक्षात घेता मुंबई पोलिसांकडून अडीच हजारहून अधिक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शपथविधी दरम्यान 10 पोलीस उपायुक्त, 20 सहाय्यक पोलीस आयुक्त, 100 पोलीस निरीक्षक, 150 सहाय्यक व पोलीस उपनिरीक्षकांसह 1500 हून अधिक पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर सशस्र पोलीस दल, टास्क फोर्ससह इतर सुरक्षा यंत्रणाही सज्ज असणार आहेत. याशिवास आझाद मैदान परिसर हा नो फ्लाईंग झोन म्हणून घोषित करण्यात आला असून आजू बाजूच्या उंच इमारतींवरही पोलिस तैनात असणार आहेत.