Maharashtra CM Oath Ceremony मुंबई: भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड झाल्यानंतर आज महायुतीकडून सरकार स्थापनेचा दावा करण्यात येणार आहे. दुपारी साडेतीन वाजता महायुतीचे नेते राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना भेटून, तिन्ही नेते सरकार स्थापनेचं पत्र राज्यपालांकडे सोपवणार आहेत. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. उद्या (5 नोव्हेंबर) आझाद मैदानात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असे तीन लोकच शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
उद्या आझाद मैदानात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असे तीन लोकच शपथ घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री तर अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची महायुतीच्या सूत्रांची माहिती आहे. घटकपक्षांना मंत्र्यांच्या जागांचा फॉर्म्युला निश्चित झाल्यावरच इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. दरम्यान, भाजपचे निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमन काल मुंबईत दाखल झाल्या आहेत. हे दोन्ही निरीक्षक शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची देखील भेट घेतील. महायुतीत एकी आहे हा संदेश पोहोचवण्यासाठी ही भेट असेल असं बोललं जातंय.
भाजपच्या विधिमंडळ पक्षाची आज बैठक-
अखेर राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याचा फैसला आज होणार आहे. भाजप विधिमंडळ पक्षनेत्याची आज मुंबईत निवड होईल. आज भाजपच्या विधिमंडळ पक्षाची सकाळी 10 वाजता मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजप आमदार आपला विधिमंडळ पक्षनेत्याच्या नावावर मोहोर उमटवतील. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरच शिक्कामोर्तब होईल अशीच चर्चा आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस विराजमान होतील हे जवळपास निश्चित आहे.
मुंबईतील आझाद मैदानात भव्य दिव्य तयारी-
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची उद्या मुंबईमध्ये शपथविधी पार पडणार आहे. या शपथविधीच्या सोहळ्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात भव्य दिव्य तयारी करण्यात आलेली आहे. या सोहळ्यात भगवा रंगाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. सोहळ्यासाठी तीन वेगवेगळे स्टेज उभारण्यात आले असून. हजारो उपस्थितितांना बसण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. उद्याच्या सोहळ्यासाठी शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळेच आझाद मैदानाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे.