अहमदनगर : अहमदनगरमध्ये लाठीकाठी आणि दांडपट्टा शिकता शिकता जागतिक स्तरावर महिला कुस्तीपटू म्हणून लौकिक मिळवलेल्या अंजली देवकर-वल्लाकट्टी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. अहमदनगर महापालिकेत वॉर्ड क्रमांक 9 मधून भाजपतर्फे त्या निवडणूक लढवणार आहेत. कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चित करणाऱ्या अंजली देवकर निवडणुकीच्या रिंगणात इतरांना धोबीपछाड करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


अहमदनगरच्या पहिल्या महिला कुस्तीपटू असलेल्या अंजली देवकर-वल्लाकट्टी यांनी कुस्ती, ज्युदो कराटे आणि इतर अनेक खेळांतून सहभाग घेत 21 सुवर्ण, 11 ब्राँझ पदके मिळवली आहेत. पंजाबमधील महिला कुस्ती स्पर्धेत पंच म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. अहमदनगरमध्ये महिला कुस्ती स्पर्धा आयोजनातही त्यांनी सहभाग घेतला होता.

शिवछत्रपती पुरस्काराने गौरव

कौटुंबीक परिस्थिती बेताची, आईचे आजारपण आणि शालेय शिक्षण सांभाळत त्यांनी लाठीकाठी आणि ज्युदो कराटेचे प्रशिक्षण घेतलं. महिला कुस्ती क्षेत्रात त्यांनी प्रवेश केला. पोलंडच्या जागतिक महिला कुस्ती स्पर्धेत त्यांनी सहावा क्रमांक पटकावला. त्यानंतर शिवछत्रपती पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आलं.

अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर वॉर्ड क्रमांक 9 मधून अंजली देवकर-वल्लाकट्टी रिंगणात आहेत. महिलांची निर्णयक्षमता चांगली असते, त्यामुळे या निवडणुकीत आपण उतरलो आहोत. यापुढे महिलांसाठी काम करणार असल्याचं अंजली देवकर-वल्लाकट्टी यांनी सांगितलं.

सध्या समाजात महिलांचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. त्यातच अंजली देवकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्ती खेळून नावलौकिक मिळवला. त्यामुळे कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चित करणाऱ्या अंजली देवकर-वल्लाकट्टी निवडणुकीच्या रिंगणात काय कमाल करणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.