"माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते," असा अजब दावा श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केला होता. नाशिकमध्ये झालेल्या एका सभेत त्यांनी हे विधान केलं होतं.
भिडेंनी सभेत शिवकालीन इतिहासाचे दाखले देत सध्याची सामाजिक, राजकीय व्यवस्थेवर जोरदार प्रहार केले होते, पण यावेळी आपल्या शेतातील आंब्याचे दाखलेही दिले होते. हे आंबे खाल्ल्याने जवळपास 150 जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावा त्यांनी केला होता.
काय म्हणाले होते संभाजी भिडे
"भगवंताची कृपा आहे ही मला एक कोय मिळाली. त्या कोईचं रोपटं करुन आता त्याचं झाडं झालं. ते आंब्याचं झाड माझ्याकडे आहे. त्याची काय मजा आहे, ते सांगतो तुम्हाला. अहो, लग्न होऊन 8-8, 10-10, 12-12 वर्ष झालेल्यांना सुद्धा पोर होत नाही, अशा स्त्री-पुरुषांनी, पती पत्नींनी ती फळं खाल्ली, तर निश्चित पोर होईल. असं झाड आहे माझ्याकडे. रोज आंबे आणून, माझ्याही बागेत, शेतात ते लावले. मी आता तुम्हाला सोडलं तर माझ्या आईशिवाय कोणाला सांगितलं नाही, ते आंबे कसे आहेत. मी आतापर्यंत 180 पेक्षा जास्त जणांना, पती-पत्नींना, जोडप्यांना खायला दिलेत. ती पद्धत शिकवली, पथ्य सांगितलं आणि 150 पेक्षा जास्त जणांना मुलं झाली. ज्यांना मुलगा हवा असेल, त्यांना मुलगाच होईल. अपत्य नसेल तर होते. असा हा आंबा आहे. म्हणजे त्याचा अर्थ नपुंसकत्वावर तोडगा आणि वंध्यत्वावरचा ताकद देणारा तो आंबा आहे."