मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच्या (23 एप्रिल) सभेत केलेल्या पोलखोलनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहिरात असलेली पोस्ट गायब झाली आहे. चिले कुटुंबाचा फोटो असलेली 'मोदी फॉर न्यू इंडिया' या फेसबुक पेजवरील जाहिरात हटवण्यात आली आहे.



'मोदी है तो मुमकीन है' म्हणणाऱ्या एका योजनेच्या जाहिरातीसाठी भाजपने वापरलेल्या फोटोतील कुटुंबाला राज ठाकरे यांनी कालच्या सभेत मंचावर आणलं होतं. खोट्या प्रचारासाठी भाजपच्या आयटी सेलच्या लावारीस कारट्यांनी या कुटुंबाच्या घरगुती फोटोचा वापर केल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आहे.

'आम्ही कशी गरिबी हटवली याचा प्रचार भाजपने केला. अशा किती कुटुंबीयांचा वापर केला असेल, किती खोटा प्रचार करणार तुम्ही?' असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. हरिसाल या डिजीटल गावाची कथित पोलखोल केल्यानंतर राज ठाकरेंनी पुन्हा भाजपवर खोट्या प्रचाराचा आरोप केला आहे.

VIDEO | राज ठाकरेंच्या मंचावर आलेल्या 'मोदी है तो मुमकीन है'मधील कुटुंबाशी बातचीत



विनोद तावडेंचं स्पष्टीकरण
राज ठाकरेंनी मुंबईतील सभेत दाखवलेला चिले कुटुंबाचा फोटो भाजपच्या किंवा सरकारच्या अधिकृत जाहिरातीमधला नाही. तो फोटो कोणत्याही अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध झालेला नाही. कदाचित हा फोटो एखाद्या मोदीप्रेमीने सोशल मीडियावर पोस्ट केला असू शकतो. मात्र, अशा पद्धतीने फोटो वापरणं हे चुकीचंच आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे." तसंच "अशाप्रकारे जाहिरातीत फोटो वापरल्याचं आमच्या लक्षात आलं, हे चिले कुटुंबातील सदस्यांनी स्वत:हून सांगितलं आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी स्वत:हून काहीतरी शोधून काढलं वगैरे असा आव आणू नये," असंही विनोद तावडे म्हणाले.

...मग भाजपने पेज का हटवलं?
दरम्यान, ही जाहिरात आमची नाही, असा दावा करणाऱ्या भाजपने ही पोस्ट का हटवली, असा सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. ते म्हणाले की, "तुमच्याबद्दल पॉझिटिव्ह गोष्टी पसरवतात तेव्हा ती पेजेस आमची आणि जेव्हा गोष्टी विरोधात जातात तेव्हा पेजेस आमची नाहीत. पंतप्रधान रोजगार हमी योजनेअंतर्गत विनोद तावडेंना काम मिळाल्यासारखं जणू ते रोज पत्रकार परिषद घेत आहेत. तावडे यांना माझा एक सल्ला आहे की, मुख्यमंत्री त्यांचा वापर करुन घेत आहेत, त्यांनी तो करुन देऊ नये. मुख्यमंत्रीच विनोद तावडेंचा किरीट सोमय्या केल्याशिवाय राहणार नाही."

VIDEO | मनसैनिकांच्या टी शर्टवर 'ए लाव रे तो व्हिडीओ'