मुंबई : ऑस्ट्रेलियाहून माहेरी आलेल्या 29 वर्षीय नर्सचा मृतदेह पंजाबमधील कालव्यात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हत्येच्या संशयातून पोलिसांनी तिच्या एनआरआय पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मृत्यूच्या वेळी ती गरोदर होती.
पंजाबमधील भाकरा कालव्यात सोमवारी पोलिसांना 29 वर्षीय रवनीत कौरचा मृतदेह आढळला होता. फिरोजपूरपासून आठ किलोमीटरवरील बग्गे की पीपल गावात रवनीतचं माहेर होतं. ऑस्ट्रेलियामध्ये पतीसोबत राहणारी रवनीत काही दिवसांपूर्वी माहेरी आली होती. 14 मार्चला घराजवळून ती बेपत्ता झाली होती.
रवनीतचे वडील हरविंदर सिंग यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिचा पती जसप्रित सिंगविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जसप्रीत मूळ चंदिगढचा रहिवासी असून कामानिमित्त तो ऑस्ट्रेलियाला स्थायिक आहे.
2013 मध्ये रवनीत आणि जसप्रीत यांचा विवाह झाला होता. त्यांना साडेचार वर्षांची मुलगी असून रवनीत पुन्हा गरोदर होती.
'जसप्रीतचे ऑस्ट्रेलियात किरण नावाच्या तरुणीशी विवाहबाह्य संबंध होते. रवनीतने वारंवार विनवण्या करुनही जसप्रीत ऐकत नव्हता. अखेर त्याने आपल्या प्रेयसीच्या मदतीने रवनीतच्या हत्येचा कट रचला' असा दावा रवनीतच्या वडिलांनी केल्याचं पोलिसांनी सांगितलं.
जसप्रीत ऑस्ट्रेलियातच राहिला, मात्र किरण रचलेला कट पूर्ण करण्यासाठी भारतात आली. 14 मार्चला रवनीत पतीसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत असताना घराबाहेरुन तिचं अपहरण करण्यात आलं. अपहरणकर्त्यांनी रवनीतचा गळा दाबला आणि तिची हत्या करुन मृतदेह कालव्यात फेकला, असंही रवनीतच्या वडिलांनी सांगितलं.
ऑस्ट्रेलियाहून माहेरी आलेल्या गर्भवतीची हत्या, कालव्यात मृतदेह आढळला, पतीवर गुन्हा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Mar 2019 11:52 AM (IST)
पंजाबमधील भाकरा कालव्यात सोमवारी पोलिसांना 29 वर्षीय रवनीत कौरचा मृतदेह आढळला होता. ऑस्ट्रेलियामध्ये पतीसोबत राहणारी रवनीत काही दिवसांपूर्वी माहेरी आली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -