अहमदनगर : 'शिवसंग्राम'च्या महिला अध्यक्षा आणि सिने अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी अहमदनगरमधील भाजप उमेदवार सुजय विखे यांना पाठिंबा दिला आहे. पत्रकार परिषद घेऊन दीपाली सय्यद यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.


2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत दीपाली सय्यद या 'आम आदमी पार्टी'कडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या, मात्र त्यांचा पराभव झाला. यंदाच्या निवडणुकीत दीपाली सय्यद यांनी सुजय विखे यांना पाठिंबा दिला आहे. सोशल मीडियावर दीपाली सय्यद या सुजय विखेंचा प्रचार करणार आहेत.

अहमदनगरमध्ये सामाजिक कामात कार्यरत असलेल्या दीपाली सय्यद यांनी काही दिवसांपूर्वी 48 गावांच्या पाणी प्रश्नाबाबत साकळाई पाणी योजना आंदोलन केलं होतं. साकळाई पाणी योजनेचा प्रश्न सुजय विखे सोडवू शकतात, म्हणून आपण त्यांना पाठिंबा देत असल्याचं दीपाली सय्यद यांनी सांगितलं.

लोकसभेत सुजय विखेंना पाठिंबा असला तरी विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याचं दीपाली यांनी स्पष्ट केलं. आम आदमी पक्षाचं काम दिल्लीपुरतं मर्यादित आहे. त्यामुळे 'आप'चा राजीनामा देऊन 'शिवसंग्राम'मध्ये प्रवेश केल्याचं त्यांनी सांगितलं.