मुंबई : हवामान खात्याकडून कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यासाठी आजचा दिवस (सोमवार, 1 एप्रिल) सोडून पुढच्या चार दिवसात, मध्य महाराष्ट्रासाठी पुढच्या तीन दिवसात, तर विदर्भासाठी पुढच्या पाच दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.


गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे गेला आहे. तर काही ठिकाणी 38-39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे उष्माघाताच्या त्रासापासून वाचण्यासाठी गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

महाराष्ट्रात चंद्रपूरमध्ये 41 अंश, नागपूरमध्ये 40 अंश, औरंगाबाद 39 अंश, सोलापुरात 39 अंश, अक्कलकोट 38 अंश, बार्शी 38 आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.