Maharashtra Vidhan Sabha Election 2024 मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मात्र, त्या दिवशी पोलिस आणि सरकारी कर्मचारी निवडणुकीच्या कर्तव्यावर असल्याने त्यांना मतदान करणे शक्य नसते. या पार्श्वभूमीवर टपाली मतदानाद्वारे पोलिसांना मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. मात्र यादरम्यान टपाली मतदान प्रक्रियेची गोपनियता भंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
टपाली मतदान प्रक्रियेची गोपनियता भंग केल्याप्रकरणी मुंबई पोलीस दलातील आणखी एका शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टपाली मतदानाचा फोटो गावाकडे व्हॉट्सअॅप केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. शिवडी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाया विरोधात कलम 223 सह लोकप्रतिनिधी अधिनियम कलम 128 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर पोलीस कर्मचारी शिवडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला शिपाई रियाझ पठाण हा मूळचा साताराच्या कोरेगावचा आहे.
नेमकं प्रकरण काय?
14 नोव्हेंबर रोजी 257 कोरेगांव विधानसभा मतदार संघ सातारासाठी पोलीस कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान घेण्यात आले. यावेळी टपली मतदान केल्यानंतर पोलिस कर्मचारी रियाझ याने मतपत्रिकेचा फोटो काढून गावी नातेवाईक आणि मित्र परिवाराला पाठवला. या व्हायरल झालेल्या टपाली मतपत्रिकेची चौकशी केल्यानंतर ही टपाली मतपत्रिका 184 भायखळा विधानसभा पोस्टल बॅलेट फॅसिलिटेशन सेंटर येथून प्राप्त झाल्याचे समोर आले. पुढील तपासात मिळालेल्या माहितीनुसार हा अर्ज मुंबई मतदार यादी क्रमांक 47 मधील या पोलीस कर्मचाऱ्याला देण्यात आला होता. पोलीस चौकशीत संबधित पोलीस कर्मचाऱ्याने गुन्ह्याची कबूली दिली. या प्रकरणी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी गावदेवी पोलीस ठाण्यातही अशाच प्रकारे टपाली मतदान प्रक्रियेची गोपनियता भंग केल्याप्रकरणी एका पोलिस शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
6 हजार 567 पोलिसांनी बजावला मतदानाचा हक्क-
आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शहरातील 6 हजार 567 पोलिसांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मुंबई शहर, जिल्ह्यातील 10 मतदारसंघांत सहा हजार 567 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सर्वाधिक मतदान कुलाबा मतदारसंघात झाले असून, तेथे एक हजार 879 जणांनी मतदान केले. त्याखालोखाल वडाळा मतदारसंघात एक हजार 407 पोलिसांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मलबार हिलमध्ये एक हजार 242, धारावीत 274, सायन कोळीवाड्यात 324, वरळीत 42, भायखळ्यामध्ये 764, मुंबादेवीमध्ये 517 आणि शिवडी मतदारसंघात 118 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान केले आहे. भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा, माहीम मतदारसंघांत शनिवारपर्यंत निवडणूक कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांना टपाली मतदानाची मुदत होती. धारावी मतदारसंघात केवळ 14 नोव्हेंबर रोजीच टपाली मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती, तर शिवडी वडाळा, वरळी मतदारसंघां 17 नोव्हेंबरपर्यंत टपाली मतदान सुरु होते.
संबंधित बातमी:
Pankaja Munde: मला सभा करायला लावताय, मग महामंडळ तरी द्या; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याची जोरदार चर्चा