मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी मतदानप्रक्रिया पार पडली. त्यामध्ये,राज्यात सरासरी 65.10 टक्के मतदान झालं असून मुंबई मराठी पत्रकार संघात महाराष्ट्र विधानसभेच्या निकालासाठी अंदाज वर्तविण्याची स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत मुंबईतील (Mumbai) पत्रकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या स्पर्धेतील सरासरी अंदाजानुसार भाजपाप्रणीत महायुती ही 140 जागापर्यंत मजल मारू शकते, तर मविआची झेपही 138 जागापर्यंत पोहचू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार, इतर व अपक्षांसाठी 10 जागांचा अंदा व्यक्त करण्यात आला आहे. एकूणच या अंदाज स्पर्धेनुसार महाराष्ट्रात त्रिशंकू विधानसभा (Vidhansabha) अस्तित्वात येऊन अपक्षांची भूमिका किंगमेकरची राहील, असे चित्र आहे. त्यामुळे, राज्याच्या विधानसभा निवडणुंकासाठीच्या निकालाचीही चुरस आणखी वाढली आहे. मतदानानंतर विविध संस्थांच्या सर्वेक्षणातून महायुतीला स्पष्ट बहुमत दर्शविण्यात आले होते. त्यामध्ये, 10 पैकी 7 संस्थांनी महायुती बहुमताचा आकडा पार करेल असा अंदाज होता. तर, 3 सर्वेक्षण संस्थांनी महाविकास आघाडीला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवला आहे. 


देशातील अनेक राजकीय सर्वेक्षण करणाऱ्या संस्थांनी भाजप महायुती आणि काँग्रेस महाविकास आघाडी यांच्या काँटे की टक्कर दर्शवली आहे. मात्र, राज्यात नंबर 1 चा पक्ष हा भाजपा राहील आणि त्यानंतर दुसर्‍या क्रमांकावर काँग्रेसचा क्रमांक लागेल, असा अंदाजही या चुरशीच्या लढतीत वर्तवण्यात आला आहे. यंदाच्या निवडणुकीतील मतदानानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक पसंती ही देवेंद्र फडणवीस यांना मिळाली असून त्यानंतर दुसर्‍या क्रमांकावर उद्धव ठाकरे तर तिसर्‍या क्रमांकावर एकनाथ शिंदेंना पसंती देण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी दिली. येत्या 23 नोव्हेंबरला विधानसभेचा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे अचूक अंदाज वर्तवणार्‍या पत्रकारांना रोख रकमेची पारितोषिके आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे, अशी माहिती स्पर्धा समन्वयक आत्माराम नाटेकर यांनी दिली. 


एक्सिस माय इंडियाचं सर्वेक्षण, महायुतीची सरशी 


एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार विदर्भातील 62 जागा वगळता 150 जागा मिळत असून त्यांना बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाविकास आघाडीला पाच विभागात केवळ 76 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  महायुतीला  पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मुंबई, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातून सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज एक्सिस माय इंडियानं वर्तवला आहे.


एक्सिस पोलनुसार महाविकास आघाडीला 82 ते 102 जागा


एक्सिस माय इंडियाच्या पोलनं  288 जागांचा एक्झिट पोल जाहीर केला आहे. त्यानुसार महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसताना पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीला 288 पैकी केवळ 82-102 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  महाविकास आघाडीला पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई वगळता इतर ठिकाणी फार यश मिळत नसल्याचा अंदाज एक्सिस माय इंडियाच्या पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. इतरांना 6-12 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


हेही वाचा


मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका