नवी दिल्ली :  देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या कारवाईचं श्रेय राजकीय व्यक्ती घेत असल्याचा आरोप माजी सैनिकांनी केला आहे.  156 माजी सैनिकांनी राष्ट्रपतींना पत्र लिहीत याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सैनिकांच्या कारवाईचं श्रेय राजकीय व्यक्ती घेत असल्याचा आरोप या पत्रामध्ये केला आहे. या पत्रावर 156 माजी सैनिकांच्या सह्या आहेत. यामध्ये माजी लष्करप्रमुख जनरल दीपक कपूर यांचाही समावेश आहे.




या पत्रावर माजी जनरल एसएफ रोड्रिग्स, माजी जनरल शंकर राय चौधरी, माजी जनरल दीपक कपूर आणि माजी पूर्व वायुसेना प्रमुख एनसी सूरी यांचा समावेश हैं.

या पत्रात माजी लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, लष्कर किंवा सैनिक कोणत्याही पक्षाचे नाहीत. पत्रात राजकीय नेत्यांद्वारे सैन्याच्या पराक्रमाचे श्रेय घेण्याला जोरदार विरोध केला आहे.

VIDEO | मोदींच्या प्रचार कार्डवर निवडणूक आयोगाचा 'सर्जिकल स्ट्राईक' | मुंबई | एबीपी माझा



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातूरच्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालाकोट एअर स्ट्राइक आणि पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या नावानं भाजपला मत द्यावं, असं भावनिक आवाहन नवमतदारांना केलं. मोदी राजकीय फायद्यासाठी शहीद जवानांच्या नावाचा वापर करत आहेत, असं म्हणत काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील केली आहे.

पहिल्यांदा पगार मिळाल्यानंतर तुम्ही तो स्वतःसाठी ठेवत नाहीत. तुम्ही ते पैसे आई किंवा बहिणीला देता. तसंच तुमचं पहिलं मत एअर स्ट्राइक किंवा पुलवामात शहीद झालेल्या जवानांसाठी द्याल का? कमळ किंवा धनुष्यबाणावरील बटन दाबल्यानंतर तुम्ही अभिमानानं सागू शकाल की तुमचं मत थेट मोदींना मिळालं,' असं मोदी म्हणाले होते.

VIDEO | औसा येथील नरेंद्र मोदींचे संपूर्ण भाषण, शहीदांचं बलिदान लक्षात ठेवून मतदान करण्याचं आवाहन | लातूर | एबीपी माझा

यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षांनी मोदींवर टीका केली आहे. राजकीय फायद्यासाठी एअर स्ट्राइक आणि पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या नावाचा वापर केला जात आहे, असं विरोधकांनी म्हटलं होतं. मोदींविरोधात विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्याची दखल घेत निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे अहवाल देखील मागितला आहे.

दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं मुंबईत छापेमारी करत सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख असलेली मोदींची प्रचार कार्ड जप्त केली होती. निवडणूक आयोगानं स्पष्ट ताकीद देऊनही मोदी हे शहीद जवान आणि एअर स्ट्राईकच्या नावाखाली मतं का मागताहेत असा सवाल विरोधकांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर आता माजी सैनिकांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. सैनिकांच्या कारवाईचं श्रेय राजकीय व्यक्ती घेत असल्याचा आरोप या पत्रामध्ये केला आहे. या पत्रावर 156 माजी सैनिकांच्या सह्या आहेत.