नवी दिल्ली - राज्यातील सत्तास्थापनेचे केंद्र आता दिल्ली झाले आहे. काँग्रेस नेते अहमद पटेल आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राज्यातील दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. जवळपास 3 तासांहून जास्त ही बैठक सुरु आहे. या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. यावेळी तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन होणार नसल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. तर, राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार येईल, असे नवाब मलिक म्हणाले.

या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर एकमत झाल्याची माहिती आहे. या बैठकीनंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले गेल्या 21 दिवसांपासून राज्यात राष्ट्रपती राजवट सुरु आहे. ती राजवट संपविण्यासाठी दीर्घवेळ चर्चा झाली. सकारात्मक चर्चा करण्यात आली. लवकरात लवकर महाराष्ट्रात स्थिर सरकार अस्तित्वात येईल. पुढील दोनतीन दिवसात निर्णय होणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन होणार नसल्याचे यावेळी चव्हाण यांनी स्पष्ट केले. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येत पर्यायी सरकार देईल, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.

या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आ. छगन भुजबळ, खा. प्रफुल्ल पटेल, खा. सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक हे उपस्थित होते, तर काँग्रेसकडून के.सी वेणुगोपाळ, मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान हे नेते उपस्थित होते. शरद पवारांच्या दिल्लीतील ६ जनपथ या निवास्थानी ही महत्वाची बैठक पार पडली.

यावर संजय राऊत काय म्हणाले -
माध्यमांच्या प्रतिनिधींनी राऊत यांना विचारले की, राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा कधीपर्यंत सुटेल? राज्याला गोड बातमी कधी मिळेल? त्यावर संजय राऊत म्हणाले की, पेढ्यांची ऑर्डर दिली आहे असं समजा, लवकरच गोड बातमी मिळेल. राज्यात सत्तास्थापनेचा कोणताही तिढा नाही. तिढा तेव्हा असतो जेव्हा काहीही हालचाली घडत नाहीत, कोणालाही परिस्थिती सुधारण्याची इच्छा नसते. परंतु, राज्यातील राष्ट्रपती राजवट दूर व्हावी, राज्याला एक चांगलं सरकार मिळावं, यासाठी आम्ही सगळेच जण प्रयत्न करत आहोत.