Wardha News : समाजातील शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना शिक्षण मिळावं असं सर्वांना वाटतं. मात्र झोपडपट्टीसारख्या ठिकाणी राहणाऱ्या शिक्षणाप्रती थोडीही ओढ नसणाऱ्या पालकांना शिक्षणाप्रती प्रवृत्त करून जिद्दीनं लढत मुलांना शिक्षण देण्यासाठी फुटपाथ स्कूल सुरू करण्याचं धाडस प्रत्येकात नसतं. या शिक्षणाच्या वाटेत गरज आहे, ती म्हणजे आधुनिक सावित्रींनी सबळ होण्याची. वंचितांना ज्ञानदान करण्यासाठी पुढे पावलं टाकण्याची आहेत. वर्ध्यात अशाच एका आधुनिक सावित्रीनं आपली पावलं पुढं टाकत 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले' नावाचं 'फुटपाथ स्कूल' सुरू करत वंचित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं आहे.
वर्ध्यातील मीनल नैताम नावाची 23 वर्षीय तरुणी
मिनल ही आधुनिक सावित्री बनून वर्ध्यातील म्हसाळा येथील वडार वस्तीतील चिमुकल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत असून गेल्या 6 ते ८ महिन्यांपासून ती फुटपाथ स्कूल मध्ये शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना शिक्षणाचे धडे गिरवीत आहे. वडार वस्तीतील मुलं सतत वाईट कृत्य, शिवीगाळ करणं, मारामारी करणं, चोरी, घाणेरड्या ठिकाणी खेळणं आणि भांडणं करताना मिनल नेहमी बघायची. त्यात लॉकडाऊनमध्ये मिनल ही समाजिक कार्य करत असताना मास्क वाटपासाठी म्हसाळा येथील वडार वस्ती परिसरात जायची. तेव्हा तिला या सर्व बाबी खटकल्या आणि येथील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा तिने ध्यासच घेतला.
अखेर स्थापन झाली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले फुटपाथ स्कूल
सुरुवातीला वस्तीतील महिलांशी तिनं बातचीत केली. हळुहळू तिनं तिथल्या महिलांना शिक्षणाप्रती प्रवृत्त केलं. अर्थातच ते फार अवघड होतं. कारण घरकाम करणं, धुणीभांडी करणं, मिळेल ते काम करणं, इतक्यावरच या वस्तीतील राहिवाश्यांचं आयुष्य होतं. शिक्षणाप्रती अजिबात कळवळा किंवा महत्व वाटत नव्हतं. मात्र मिनलनं परिस्थिती बदलली. येथील नागरिकांना शिक्षणासाठी प्रवृत्त केलं आणि मुलांना शाळेत घेऊन आली. मुलं बाहेर शिकायला जाण्यास तयार नव्हती म्हणून तिनं थेट या वडार वस्तीतच फुटपाथ शाळा सुरू केली. आणि नाव दिलं "क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले" शाळा. या कामात तिला तिचे आईबाबा, मित्र मौत्रिणी आणि कुंभलकर कॉलेजमधील शिक्षकांचंही मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभलं.
समाजकार्य विभागातील विद्यार्थ्यांनाही वंचितांना शिक्षण देण्याची आवड
सर्वसामान्य कुटुंबातील असलेल्या मिनलच्या शाळेत सध्या 40- 42 विद्यार्थी शिक्षण घेत असून, काहींच्या परीक्षा सुरू आहेत. मिनल ही वर्ध्यातील कुंभलकर कॉलेज येथील समाजकार्य विभागाची विद्यार्थिनी आहे. सध्या ती वर्धा शहरातील डॉ वर्मा हॉस्पिटलमध्ये मेडिसिन विभागात कार्यरत असून आपल्या कर्तव्यातून वेळ काढून मुलांना शिक्षण देण्यासाठी धडपड करत आहे. दुपारी 1 ते 3च्या वेळेत तिची शाळा भरते. मिनलला मुलं खूप पुढे जावी, जिद्दीनं अभ्यासाला लागावी एवढीच अपेक्षा आहे. वर्ध्यातील कुंभलकर कॉलेजमधील समाजकार्य विभागातील मीनलच्या ज्युनियर्सना देखील या फुटपाथ स्कूलमध्ये येऊन शिकविण्याची आवड निर्माण झाली आणि तेही आता मुलांना शिकविण्यात मग्न आहेत.
इतरांनी केलेल्या सहकार्यातून मिनलला मदत
मिनल स्वखर्चानं मुलांना शिकवतं. शिवाय शाळेतील शिक्षकांकडून किंवा मित्रमैत्रिणींकडून मिळालेल्या आर्थिक सहकार्याने किंवा शिक्षणोपयोगी साहित्याच्या मदतीनं शाळेतील गरचेचा खर्च करण्यास तिला सहकार्य होते. तर वडार वस्तीतील महिलांचे मतपरिवर्तन करण्यात देखील यशस्वी होत आहे. आता या झोपडपट्टीतील महिला स्वतः आपल्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी शाळेत पाठवायला तयार होतात. हा बदल घडवून आणण्यात मिनलच्या प्रयत्नांना यश आलं आहे.
थोर पुरुष किंवा समाज सुधारकांची जयंती पुण्यतिथीचे कार्यक्रमही होतात साजरे
या फुटपाथ स्कूलमध्ये नुकताच प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. यात विद्यार्थ्यांनी आनंदात सहभाग घेतला होता. विविध समाज सुधारक आणि थोर पुरुषांच्या जयंती देखील शाळेत विद्यार्थ्यांना माहिती मिळावी या हेतूनं साजरी केली जाते.
मिनलसारख्या आधुनिक सावित्रींनी पुढे येण्याची गरज
या वस्तीतील मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी देखील मीनल प्रयत्नशील आहे. मिनलसारख्या तरुणींनी जर वंचितांना शिक्षण देण्यासाठी पावले पुढे टाकली. तर आपला समाज हा नक्कीच शैक्षणिकदृष्ट्या सबळ होण्यास मदत होईल. मिनलसरख्या आधुनिक सावित्रीला एबीपी माझाचा सलाम!
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI