मुंबई : राज्याच्या शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावी परीक्षा संदर्भात घेतलेल्या निर्णयाचा शिक्षक संघटनांकडून जोरदार विरोध होत आहे. सोबतच पालकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. बहुतांश शाळांमध्ये परीक्षा सुरु झाल्या आहेत किंवा मार्चअखेरीस नियोजित आहेत. अशा परिस्थितीत शिक्षण विभागाने घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक आणि शिक्षकांसाठीही अडचणीचा ठरत आहे.


शिक्षण विभागाचा निर्णय
"इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा या एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात घेण्यात याव्यात. या परीक्षांचा निकाल मे महिन्यामध्ये जाहीर करावा. तसंच  एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत सोमवार ते शनिवार शाळा सुरु ठेवावी. सोबतच रविवारी सुद्धा ऐच्छिक स्वरुपात शाळा सुरु ठेवण्यात याव्यात," अशाप्रकारचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.


शिक्षक अडचणीत, पालकांची नाराजी
मात्र राज्यातील अनेक शाळांमध्ये परीक्षा सुरु झाल्या आहेत. काही शाळांच्या परीक्षा मार्चअखेरीस नियोजित आहेत, त्यात ऐनवेळी शिक्षक विभागाने असा निर्ण घेतल्याने शिक्षक अडचणीत आले आहेत. शैक्षणिक वर्षाच्या वेळापत्रकानुसार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा पूर्ण होतात. मात्र या वर्षी एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात परीक्षा घेतल्या जात असल्याने पालकांमध्ये सुद्धा नाराजी आहे. अनेक पालकांनी एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये बाहेरगावी जाण्यासाठी आरक्षण केलं आहे. त्यामुळे परीक्षा पुढे जात असल्याने पालक सुद्धा याचा विरोध करत आहे.


शाळांमध्ये परीक्षा सुरु असताना किंवा परीक्षेची तयारी सुरु असतानाच शालेय शिक्षण विभागाने 24 मार्च रोजी इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीची परीक्षा एप्रिलच्या तिसर्‍या आठवड्यात घेण्याबाबतचं परिपत्रक काढलं. शिक्षण विभागाच्या परिपत्रकामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. सध्या नववीच्या परीक्षा सुरु असल्याने एप्रिलच्या तिसर्‍या आठवड्यात परीक्षा घेण्याचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी शिक्षक आणि पालकांकडून केली जात आहे.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI