सातारा : राज्यातील लोकांनी जो निर्णय दिला आहे तो आम्हाला मान्य आहे. त्याचा अभ्यास करणार आणि पुन्हा लोकांपुढे जाणार असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं. यूपीतून आलेल्या आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे' या प्रचाराचा मतदारांवर परिणाम झाल्याचं पवारांनी मान्य केलं. तसेच लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला मतं मिळाली असंही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी कराडमध्ये माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
महिलांचे मतदान दोन टक्क्यांनी वाढलं
लाडकी बहीण योजनेचा निकालावर परिणाम झाल्याचं दिसतंय असं शरद पवार म्हणाले. ते म्हणाले की, "महायुतीच्या विजयामध्ये लाडकी बहीण योजना हे एक कारण आहे. सत्तेत नसलो तर ही योजना बंद होईल अशी भीती महिलांना घालण्यात आल्याची अनेकांनी सांगितलं. त्यामुळे महिलांच्या मतदानामध्ये दोन टक्क्यांची वाढ झाल्याचं समोर आलं."
'कटेंगे तो बटेंगे'चा परिणाम
यूपीतून आलेल्या योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या कटेंगे तो बटेंगे घोषणेचा महाराष्ट्रात परिणाम झाला हे शरद पवारांनी मान्य केलं. ते म्हणाले की, त्यामुळे धार्मिक ध्रुवीकरण झालं आणि त्याचा फायदा महायुतीला झाला.
ईव्हीएमवर काय म्हणाले शरद पवार?
ईव्हीएममुळे महायुतीची सत्ता आली अशी चर्चा सुरू असताना त्यावर शरद पवारांनीही प्रतिक्रिया दिली. आपल्याकडे अजून कोणतीही अधिकृत माहिती नाही, त्यामुळे आपण यावर काहीही भाष्य करणार नाही असं शरद पवार म्हणाले.
झारखंडमधील काही सहकाऱ्यांनी त्यांना काही माहिती दिल्याचं पवार म्हणाले. ते म्हणाले की, "चार महिन्यापूर्वी हरयाणा आणि जम्मूमध्ये निवडणूक झाली. त्यावेळी जम्मूमध्ये काँग्रेसला यश आलं तर हरयाणात भाजपला यश आलं. त्यानंतर महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निवडणूक झाली. त्यासाठी ठरलेल्या वेळेपेक्षा एक महिना उशिरा महाराष्ट्रात निवडणूक घेतली. त्यामध्ये झारखंडमध्ये काँग्रेसला यश आलं तर महाराष्ट्रामध्ये भाजप आलं. त्यामुळे एक लहान राज्य विरोधकांना द्यायचं आणि एक मोठं राज्य घ्यायचं असं दिसतंय. त्यामुळे त्यामुळे उद्या कोणी म्हणायला नको की ईव्हीएममुळे मतदान पडलं. त्यावेळी एक राज्य तुम्हाला आलंय हेदेखील म्हणतात."
मराठा-ओबीसी वादाचा निवडणुकीवर परिणाम?
मराठा-ओबीसी वादामुळे ओबीसी एकत्र येऊन त्यांनी महायुतीला मतदान केलं का असा प्रश्न विचारल्यानंतर शरद पवार म्हणाले की, त्याचा काय परिणाम झाला याचा अभ्यास अजून केला नाही. पण मराठा-ओबीसी मतांच्या ध्रुवीकरणावर खोलात जाऊन अभ्यास करणार. ओबीसी वर्गाबद्दल आमच्या मनात वेगळी भावना नाही. ओबीसी समाजाच्या मंडल आयोगाचा निर्णय माझा आहे. आरक्षणाच्या बाबतीत देखील आम्ही निर्णय घेतला होता. ओबीसींच्या आरक्षणाच्या बाबतीत निर्णय घेतला त्याचा अध्यक्ष मी होतो.
या निवडणुकीत पैशाचा मोठा वापर
या निवडणुकीत विरोधकांकडून पैशाचा मोठा वापर करण्यात आल्याची माहिती आपल्याला सहकाऱ्यांनी दिल्याचं शरद पवार म्हणाले. या आधी राज्यात असं कधीही झालं नव्हतं असंही शरद पवार म्हणाले.
अजित पवारांचे यश मान्य, पण युगेंद्रला उभे करण्यात चूक नव्हती
अजित पवारांना मोठं यश मिळालं हे मान्य करण्यात काही गैर नाही असं शरद पवार म्हणाले. बारामतीच्या निकालावर बोलताना ते म्हणाले की, "युगेंद्र पवार आणि अजित पवार ही तुलना होऊ शकत नाही. पण बारामतीत उमेदवार दिला नसता तर राज्यात काय संदेश गेला असता? आम्हाला आधीच माहिती होतं, कारण अजित पवार यांनी बारामती खूप काम केलं आहे. पण पुढची निवडणूक लढवण्यासाठी आम्हाला उमेदवार उभा करणे भाग होतं."
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI