Omicron Variant and School Reopening in Maharashtra : महाराष्ट्र सरकारने एक डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉन आढळल्याने खळबळ उडाली आहे. राज्य सरकारनेही या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. ओमिक्रॉनमुळे चिंतेचे वातावरण असताना दुसरीकडे आता पुन्हा शाळा सुरू होणार का, याबाबत  विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे.  


कोरोनाची महासाथ ओसरल्यानंतर सरकारने पहिली ते सातवीपर्यंतची शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. चाईल्ड टास्क फोर्सनेही शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला हिरवा झेंडा दाखवला होता. आता मात्र ओमिक्रॉनमुळे सुरू असलेल्या घडामोडींमुळे शाळा सुरू करण्याबाबतच्या निर्णयावर शिक्षक, पालकांमध्ये मतमतांतरे असल्याचे दिसून येते. 


या टप्प्यातील शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाने वेट अँड वॉच ची भूमिका घ्यावी  असे शिक्षक संघटनांनी म्हटले आहे. 15 दिवसांनी या निर्णयाबाबत विचार करावा असेही शिक्षक संघटनांनी म्हटले. मुंबईतील शिक्षकांची दोन दिवसात पहिली ते सातवी या टप्प्यातील शाळा सुरू करण्याबाबत तयारी नसल्याचे काहींनी म्हटले आहे. आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचना पाहता आणि पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता शाळा सुरू करण्याची तयारी दोन दिवसात होणे अशक्य असल्याचे मुंबईतील शिक्षकांनी म्हटले आहे. 


पालकांकडूनही शाळा सुरू करण्याच्या निर्णयाबाबत आता सावध पवित्रा घेतला जात आहे. शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचे स्वागत करणाऱ्या काही पालकांनी बदललेल्या परिस्थितीत मुलांना शाळेत पाठवण्यास नकार दिला आहे. 


शाळा सुरू करण्यास शिक्षण विभाग ठाम


पहिली ते सातवी शाळा सुरू करण्यावर सध्यातरी शिक्षण विभाग ठाम आहे. मार्गदर्शक सूचना बाबत पुन्हा एकदा टास्क फोर्स सोबत चर्चा करण्यात येणार आहे. चाइल्ड टास्क फोर्ससोबत झालेल्या बैठकीनंतर आज किंवा उद्या पहिली ते सातवी च्या शाळा सुरु करण्याचा निर्णय बाबत शासन निर्णय जारी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. चाइल्ड टास्क फोर्स सुद्धा पुढील बैठकीत नव्या मार्गदर्शक सूचना देणार आहे. मात्र सध्यातरी चाइल्ड टास्क  सदस्य सुद्धा शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक असल्याचे सूत्रांनी सांगितले. 


मुंबईत शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाच्या शासन निर्णयाचीच प्रतिक्षा


शासन निर्णय आल्यानंतर प्रस्ताव हा मुंबई महापालिका आयुक्तांना पाठवला जाईल आणि त्यानंतर आयुक्तांच्या मंजुरीने मुंबईतील शाळा सुरू करण्याचे आदेश देण्यात येतात असे मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी म्हटले. मात्र, अद्याप आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचना आल्या असल्या तरी शिक्षण विभागाकडून कुठलाही अधिकृत शासन निर्णय (GR)आलेला नाही. त्यामुळे शाळा सुरू करण्याच्या बाबतीत शासन निर्णयाची वाट पाहत आहोत असेही त्यांनी सांगितले. 


विद्यार्थ्यांनी पालकांनी संभ्रमात न राहण्याचे आवाहन 


शाळा सुरू करण्याबाबत येत्या काही दिवसात निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, शाळा सुरू झाल्या नाहीत तरी ऑनलाइन शिक्षण सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:


Omicron variant : ओमिक्रॉनच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु होणार का? राजेश टोपेंचं महत्वाचं वक्तव्य


कोरोनाच्या 'बोत्सवाना व्हेरिएंट'मुळे जगभरात खळबळ; जाणून घ्या विषाणूबाबत प्रमुख मुद्दे


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI