पुणे : महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल (SSC Result) आज जाहीर केला जाणार आहे. आज बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासूनची विद्यार्थ्यांची आणि पालकांची आता प्रतीक्षा संपली आहे. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 9 लाख 75 हजार 894 विद्यार्थी तर 7 लाख 89 हजार 894 विद्यार्थीनी होत्या. राज्यातील एकूण 22 हजार 586 माध्यमिक शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. तर 4979 परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा घेण्यात आली होती.


विद्यार्थ्यांना बोर्डाच्या  www.mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर दहावीचा निकाल पाहता येईल.

यावर्षी दहावीची लेखी परीक्षा 3 मार्च ते 23 मार्च या काळात आयोजित करण्यात आली होती. दहावीचा शेवटचा भूगोलाचा पेपर होता. पण कोरोनाची वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे हा पेपर रद्द करण्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केला. 24 मार्चपासून सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे तर उत्तरपत्रिका पोस्टामध्येच अडकून पडल्या होत्या. लॉकडाऊनमुळे उत्तरपत्रिका तपासणी आणि त्यांचं विभागीय मंडळांमध्ये संकलन हे एक मोठं आव्हान महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळापुढे होतं. त्यातच दहावी भूगोलाचा पेपर न झाल्यामुळे दहावीच्या विषयांचं गुणदान कसं करायचं हा एक मोठा प्रश्न मंडळापुढे होता. अखेर त्याचाही निर्णय झाला. बाकीच्या विषयांमध्ये मिळालेल्या गुणांची सरासरी काढून त्याचं रुपांतर हे रद्द झालेल्या भूगोल पेपरच्या गुणांमध्ये करण्यात येणार असल्याचं जाहीर झालं. यामुळे दहावीच्या गुणदानाचा तिढा सुटला. मागच्या वर्षी 8 जूनला दहावीचा निकाल लागला होता.

कसा पाहाल निकाल?
दहावीचा निकाल पाहाण्यासाठी वरील वेबसाईटवर लॉगऑन करता. इथे निकाल पाहण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील. समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल. त्यानंतर निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

रिचेकिंगसाठी ऑनलाईन अर्ज
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणपडताळणी उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत मिळणे आणि पुनर्मूल्यांकनासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत या गोष्टींसाठी विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन अर्ज करावे लागत होते. पण आता या प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. निकाल जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून ही प्रक्रिया सुरु केली जाईल.

दहावीचे विद्यार्थी http://verification.mh-ssc.ac.in या वेबसाईटवरुन अर्ज करु शकतील. या अर्जासाठी लागणारी फी सुद्धा आॅनलाईन भरावी लागेल. आज 29 जुलैला दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर 30 जुलैपासून विद्यार्थी या वेबसाईटवरुन अर्ज दाखल करु शकणार आहेत.

Education Loan Information:

Calculate Education Loan EMI