मुंबई : महाराष्ट्रात सीबीएसई पॅटर्नवर आधारित अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात जो काही संभ्रम तयार झाला होता, जे काही प्रश्न निर्माण झाले होते, माध्यमांनी जे प्रश्न उपस्थित केले होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शिक्षणमंत्र्यांकडून देण्यात आली आहेत. महाराष्ट्र राज्याचे सीबीएसई पॅटर्नवर आधारित नवे शालेय शिक्षण धोरण नेमके कसे याबाबत त्यामध्ये स्पष्टीकरण दिलं आहे. NCERT चा अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके आणि CBSE परीक्षा पद्धतीचा स्वीकार राज्याच्या शालेय शिक्षण धोरणात कसा करणार याची सविस्तर माहिती देण्यात आल्याने शिक्षक पालकांचे संभ्रम दूर होणार आहे. CBSE पॅटर्नवर आधारित नव्या शालेय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने कशी होणार याचीही माहिती देण्यात आली आहे.
CBSE पॅटर्नवर आधारित नव्या शालेय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी या शालेय शैक्षणिक वर्षापासून होणार आहे. त्याची एकूण 4 टप्प्यात अंमलबजावणी होणार आहे.
- 2025-26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीसाठी.
- 2026-27 या शैक्षणिक वर्षात 2 री, 3 री, 4 थी व 6 वी
- 2027-28 या शैक्षणिक वर्षात 5 वी, 7 वी, 9 वी व 11 वी
- 2028-29 या शैक्षणिक वर्षात 8 वी 10 वी व 12 वी.
या वर्गामध्ये टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होणार आहे.
राज्य मंडळाची पुस्तक बालभारतीकडूनच तयार केली जाणार का?
महाराष्ट्र राज्य मंडळाची पुस्तक बालभारतीकडूनच तयार केली जाणार आहेत. NCERT यांनी बनवलेले पाठ्यपुस्तके बालभारती समितीकडून अभ्यासून राज्यासाठी स्वतःची पाठ्यपुस्तके आवश्यक ते सर्व बदल करून बनविण्यात येत आहे .
नवा अभ्यासक्रम कसा आणि कोणाकडून केला जाणार?
नव्या शालेय शिक्षण धोरणानुसार इयत्ता पहिलीची आणि टप्प्याटप्प्याने दहावीपर्यंतची पाठ्यपुस्तके अभ्यासक्रम तयार केला जाणार आहे. नवीन पाठ्यक्रमानुसार बालभारतीमार्फत इ. 1 ली पाठ्यपुस्तक निर्मिती कामकाज सुरु आहे. राज्यासाठी इ. 1 ली ते 10 वी साठी अभ्यासक्रम / पाठ्यक्रम निर्मिती SCERT मार्फत करण्यात येत आहे.
राज्य मंडळ बंद होणार का?
महाराष्ट्राला उज्ज्वल शैक्षणिक परंपरा आहे. त्यामुळे आपल्या राज्याचे अस्तित्व दाखवणारे राज्यमंडळ बंद करण्याचा कोणताही विचार नाही. सीबीएसई पॅटर्नवर आधारित अभ्यासक्रम राज्यात राबवला जाणार आहे. राज्यातील इ.10 वी व इ.12वी परीक्षा आयोजनाची जबाबदारी प्रचलित पद्धतीनुसार राज्यमंडळाकडेच असेल.
पालकांवर बोर्ड निवडीचे बंधन असणार का?
राज्यमंडळ अस्तित्वात राहणार असल्याने पालकांनी आपल्या पाल्यास कोणत्या बोर्डातून शिक्षण घ्यावे किंवा कोणत्या शाळेत प्रवेश घ्यावा याबाबत कोणतेही बंधन नाही.
राज्याचा इतिहास, भूगोल आणि भाषा विषयाचं काय होणार?
महाराष्ट्राला संत-समाजसुधारकांची फार मोठी परंपरा आहे. नवीन अभ्यासक्रमात महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, संत, समाजसुधारक, ऐतिहासिक व्यक्तिरेखा इत्यादी सर्व बाबींना इतिहास, भूगोल, भाषा विषय इ. सर्व संबंधीत विषयामध्ये प्राधान्य देण्यात आले आहे.
राज्यातील सर्व परीक्षा मंडळांचे अभ्यासक्रम असलेल्या, सर्व माध्यमांच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन अनिवार्य करण्यात आलेले आहे. त्यामुळे मराठी भाषा विषयाचे महत्व कुठेही कमी होत नाही. अभिजात दर्जा मिळालेल्या आपल्या मराठी भाषेला सन्मानाचेच स्थान मिळेल व हा निर्णय हा मराठी साहित्य, कला, संस्कृतीच्या उज्ज्वल परंपरेला योग्य ठरणार आहे.
शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक असेल?
वेळापत्रकासंदर्भात खुलासा करण्यात येतो की आपल्या सध्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार व हवामानानुसार शाळांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येणार आहे.
सरकारी शाळांमध्ये मुलांना मोफत शिक्षण असणार का?
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळा शासन मान्यता प्राप्त अनुदानित शाळा यामधील मुलांना दहावीपर्यंतचे शिक्षण आणि मुलींना बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत दिले जात आहे.
शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे काय?
शिक्षकांचे प्रशिक्षण संदर्भात नमूद करण्यात येते की नवीन अभ्यासक्रम धोरणानुसार शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू असून शिक्षकांना ब्रिज कोर्सद्वारे सुद्धा अतिरिक्त प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सीबीएसई पॅटर्न प्रमाणे अभ्यासक्रम करण्याची आवश्यकता का?
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये अपेक्षित कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये येण्यासाठी घोकंपट्टीवर आधारीत परीक्षा पद्धती न ठेवता CBSE यांच्या परीक्षा पद्धतीप्रमाणे सर्वकष प्रकारचे मूल्यमापन महाराष्ट्राच्या राज्य मंडळाच्या पद्धतीत आणून आणि त्यातही आवश्यक ते बदल/सुधारणा करुन त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल.
CBSE च्या परीक्षापद्धतीची वैशिष्टये :
1) संकल्पनांवर भर पाठांतरापेक्षा संकल्पनांच्या समजुतीवर अधिक लक्ष दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळते.
2) सतत आणि सर्वसमावेशक मूल्यमापन (CCE Continuous and Comprehensive Evaluation) - विद्याथ्यांच्या सततच्या प्रगतीवर लक्ष ठेवले जाते केवळ अंतिम परीक्षांवर भर न देता, प्रकल्प, उपक्रम आणि इतर मूल्यांकन तंत्रांचा समावेश केला जातो.
3) राज्य, देश व जगाच्या पातळीवरचे ज्ञान मिळते.
4) स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त सीबीएसई अभ्यासक्रम JEE, NEET, UPSC यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांसाठी फायदेशीर ठरतो,
5) सॉफ्ट स्किल्स आणि समुपदेशनावर भर विद्याव्यांच्या वैयक्तिक विकासावर लक्ष केंद्रित केले जाते, त्यांना संवाद कौशल्ये, नेतृत्वगुण, सृजनशीलता आणि तणाव व्यवस्थापन शिकवले जाते.
6) CBSE पॅटर्नमुळे विदयार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळते व त्यांचे भविष्य घडविण्यास मदत होते.
ही बातमी वाचा:
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI