मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. शिष्यवृत्ती परीक्षा ही  20 जुलै रोजी महाराष्ट्रात राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना आवेदनपत्र भरण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.


शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात नियोजित असते. यावर्षी सुद्धा 20 फेब्रुवारी रोजी परीक्षा घेतली जाणार होती. या दृष्टीने परीक्षा परिषदेने डिसेंबर महिन्यात अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली होती. मात्र, यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना शाळा बंद असल्यामुळे अर्ज भरण्यास संधी न मिळाल्याने मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे परीक्षेचे नियोजन कोलमडले आणि ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.


त्यानंतर एकीकडे दहावी आणि बारावीची बोर्ड परीक्षा आणि दुसरीकडे टीईटी परीक्षेतील गैरप्रकार, यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याची जबाबदारी कोणत्या कंपनीला द्यावी? असा प्रश्न परीक्षा परिषदेसमोर होता. मात्र आता सरकारने विनर कंपनीच्या सहकार्याने परीक्षा घेण्यासंदर्भात सूचना दिली असल्याची माहिती आहे


परीक्षा परिषदेकडून शिष्यवृत्ती परीक्षा बाबतची सुधारित माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे संभ्रमात असलेला विद्यार्थी शिक्षक आणि पालकांना शिष्यवृत्ती परीक्षा नेमकी कधी होणार या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे.


राज्यभरातून यंदा इयत्ता पाचवीचे 4 लाख 10 हजार 395 आणि इयत्ता आठवीचे 2 लाख 99 हजार 255 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात होणारी परीक्षा आता जुलै महिन्यात होणार आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतरच या शिष्यवृत्ती परीक्षेला मुहूर्त लागला आहे.


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI