पुणे :  राज्यातील इयत्ता पाचवी आणि  आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने घेतला आहे.  ही परीक्षा 20 फेब्रुवारीला होणार होती.  त्याचबरोबर या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज आणि परीक्षा फी भरण्यासाठी आता 31 जानेवारीपर्यंत शाळांना मुदतवाढ देण्यात आली आहे. ही परीक्षा 20 फेब्रुवारीला होणार होती आणि त्यासाठी फॉर्म भरण्याची मुदत आधी 31 डिसेंबर 2021 पर्यंत देण्यात आली होती.




 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळा अचानक बंद कराव्या लागल्या.  ज्यामुळे अनेक शाळांना या शिष्यवृत्ती परीक्षेसाठीची आवश्यक प्रक्रिया पूर्ण करता आली नव्हती.  त्यामुळे 20 फेब्रुवारीला होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शिक्षण परिषदेकडून घेण्यात आला आहे. या परीक्षांची नवीन तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्य हिताचा आणि सुरक्षितेला प्राधान्य देत शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन न करण्याचा निर्णय घेतला आहे. पाचवी ते आठवी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आज जाहीर केले आहे. यामुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना मोठा दिलासा मिळणार आहे.


तर राज्यातील शाळा सुरू ठेवण्यावरून राज्य सरकारमध्ये मतभेद असल्याचे चित्र दिसत आहे. कारण,  ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव नाही, अशा ठिकाणी शाळा सुरू करण्यास हरकत नसल्याचे अनेक मंत्र्यांचे मत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मंत्र्यांनी भूमिका तशी भूमिका देखील मांडली आहे. मात्र, कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता शाळा बंद ठेवण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्याच्या मुद्यावरुन मंत्रीमंडळात दोन वेगवेगळे मतप्रवाह असल्याचे दिसत आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



महत्त्वाच्या बातम्या:



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI