मुंबई :  बनावट नोटा छापणाऱ्या एका भामट्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 57 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीचे नाव मोहम्मद फकीयान अयूब खान असून पोलीस अधिक तपास करत असून कर्ज फेडण्यासाठी त्यानी घरातच नोटा छापण्याचा कारखाना सुरू केला होता.


क्राईम ब्रांचचे एसपी नितीन अलकनुरे यांनी माहिती दिली की, एक तरूण चेंबूर येथे बनावट नोटांची विक्री करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. क्राईम ब्रांच यूनीट चारचे निरिक्षक निनाद सावंत आणि त्यांच्या टीमने एमएमआरडीए कॉलनीजवळ माहुल गावात सापळा रचून तरूणाला बेड्या ठोकल्या आणि त्याच्याकडून 57 हजार रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या.


तपासा दरम्यान आरोपीने पोलिसांना काही बनावट नोटा घरी ठेवल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकला. यामध्ये 3 लाख 98 हजार 550 रुपयांच्या नोटा आणि इतर साहित्य जप्त केले.


आठ वर्षापूर्वी खान मुंबईत आला होता. मुंबईत तो आपल्या नातेवाईकांकडे कपड्याचा व्यवसाय करत होता. परंतु या नोकरीतमध्ये कमी पगार मिळत होता. त्यानंतर त्याने स्वत:चा कपड्याचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने आपल्या पत्नीचे दागिने गहान ठेऊन व्यवसाय सुरू केला. कोरोनाकाळात लॉकडाऊनचा फटका व्यवसायाला बसला. यामध्ये त्याचे नुकसान झाले आणि सहा लाखांचे कर्ज झाले.


कर्ज फेडणे त्याला शक्य होत नव्हतं आणि नोकरी मिळणे लॉकडाऊनमुळे अवघड होते. म्हणून खानने नकली नोटा बनवून आपलं कर्ज परत फेडण्याचा पर्याय निवडला आणि शेवटी तुरुंगात पोहोचला.


नोटा छापण्यासाठी एक खोली भाड्याने घेतली. विशेष म्हणजे या नोटा कशा बनवायच्या हे तो यू ट्यूब व्हिडीओ पाहून शिकला. पूर्ण अभ्यास केल्यानंतर त्याने नोटा छापण्यासाठी एक कम्प्युटर, प्रिंटर आणि नोटांचे कागद खरेदी केले. आरोपीने अगोदर फक्त 50 आणि 100 रुपयांच्या दहा हजार नोटा बनवल्या. त्या बनावट नोटा आपल्या मित्राला दिल्या परंतु मित्राला देखील बनावट नोटा असल्याचे लक्षात आले नाही याची खात्री झाल्यावर त्याचा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर त्यानी 30 हजार नोटा छापल्या. आतापर्यंत आरोपीने 4 लाख नोटा छापल्या.


बनावट नोटा छापणाऱ्यांना माहिती आहे की, हजारांच्या किंवा पाचशेची नोट असेल तर लोक ती एकदा तपासून पाहतात, मात्र शंभरची नोट क्वचितच कोणी तपासतो. त्यामुळे 10, 50 आणि 100 रुपयांच्या नोटा छापण्यास सुरूवात केली आहे. नकली नोट छापण्यामध्ये तो एकटाच होता का? किंवा त्याच्यासोबत आणखी कोणी सहभागी होतं? याचा तपास गुन्हे शाखेकडून केला जात आहे.