Yavatmal News Update : डोळे तपासणी मशीनची फ्राँन्चायसी (शाखा) देण्याचे आमिष दाखवून एका प्राध्यापकाच्या पत्नीची तब्बल 44 लाख रूपयांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना यवतमाळ शहरातील दर्डा नगर परिसरात 13 मे ते  15 जून 2022 दरम्यान घडली आहे. या प्रकरणी अवधुतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून हरियाणातील सहा जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुलकीत कपूर (रा. फरिदाबाद, हरियाणा ) याच्यासह सहा जणांचा यात समावेश आहे.


या प्रकरणी प्रतिमा प्रविण इंगळे (वय 48 वर्ष रा. दर्डा नगर, यवतमाळ ) यांनी अवधुतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. इंगळे यांच्या तक्रारीनूसार, प्रतिमा इंगळे यांचे बँक ऑफ इंडियामध्ये खाते आहे. त्यांचे पती प्रविण इंगळे समाजकार्य महाविद्यालयात प्राध्यपक म्हणून कार्यरत असून त्यांनी एसबीआयमधून 43 लाख रूपयांचे कर्ज घेतले होते. ती रक्कम प्रतिमा इंगळे यांच्या अकाऊंटमध्ये टान्सफर करण्यात आली. प्रतिमा इंगळे यांनी त्यांच्या गुगल अॅपवरून लेन्स कार्ट सोल्युशन प्रायव्हेट लिमीटेड फरिदाबाद या कंपनीकडे फ्राँन्चायसी (शाखा) करीता सर्च केले. त्यानंतर 13 मे 2022 रोजी  इंगळे यांच्या मेलवर कंपनीकडून ऑनलाईन अर्ज पाठविला. तो त्यांनी त्याच दिवशी भरून पाठविला. त्यानंतर इंगळे यांच्या व्हॉट्सअॅपवर पुलकीत कपूर असे नाव आणि मोबाईल क्रमांक पाठविला. त्यानंतर  17 मे रोजी कपूर यांनी कन्फॉर्मेशन लेटर पाठविले आणि पैसे पाठविण्यास सांगितले. 


पैसे पाठवण्यास सांगितल्यानंतर इंगळे यांनी मोबाईल युपीआयवरून 55 हजार 800 रूपये आणि पती प्रविण यांच्या मोबाईलवरून 90 हजार रूपये पाठविले. त्यानंतर आरटीजीएसमार्फत 18 मे रोजी फ्राँन्चायसी फी म्हणून दोन लाख 36 हजार रूपये 39 48744351 या एसबीआय फरिदाबादच्या अकाउंटवर पाठविले. त्यानंतर 2 जून रोजी डोळे तपासणी मशीनसाठी 34984714351 या एसबीआयच्या खात्यावर पाच लाख रूपये पाठविले.


इंगळे यांनी रक्कम पाठवल्यानंतर पुलकीत कपूर याने प्रोसेस लेटर पाठवून पुढील येणारा खर्च आणि त्यासाठी लागणारी रक्कम याचे सविस्तर विवरण पाठविले. त्यानूसार 7 जून रोजी आरटीजीएसमार्फत 30701364287 या अकाऊंटनंबरवर त्याच दिवशी पाच लाख रूपये आणि नंतर पाच लाख रूपये पाठविले. त्यानंतर 8 जून रोजी कपूर याने पाठवलेल्या खात्यावर दहा लाख रूपये पाठविले. त्यानंतर  13 जून रोजी दहा लाख 20 हजार रूपये पाठविले. त्यानंतर 15 जून रोजी हिशोबात नसलेले अतिरिक्त विम्यासाठी पाच  लाख रूपये पाठविले. असे एकूण 44 लाख एक हजार 800 रूपये इंगळे यांनी पाठविले.


संपूर्ण रक्कम पाठवल्यानंतर 8273053398 या मोबाईल नंबरवरून सांगितल्याप्रमाणे दुकानाचे फर्नीचर आणि पुढील प्रक्रिया पूर्ण करण्याचे कबूल करण्यात आले. त्यासाठी व्यक्ती पाठविणार होते. परंतू  15 जून रोजी दुपारी फोन लावाला असता तो नंबर बंद होता. इंगळे यांनी अनेक वेळा त्या नंबरवर फोन लावण्यात आला. परंतु, फोन नंबर बंद होता. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर इंगळे यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास अवधुतवाडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.