Yavatmal News यवतमाळ : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत. अशातच राज्यात बोगस बियाणांचा (Prohibited Seeds) सुळसुळाट असल्याचे देखील बघायला मिळाले आहे. या बोगस बियाणांच्या विक्री प्रकरणी कृषी विभाग सतर्क झाले असून अशा बोगस आणि प्रतिबंधित बियाणे विक्री करणाऱ्यांवर प्रशासन नजर ठेवून आहेत. असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात (Yavatmal News) छुप्या पद्धतीने प्रतिबंधित असलेल्या कपाशी बियाणांची विक्रीचा सिलसिला सुरूच असल्याचे बघायला मिळाले आहे.


तर दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस आणि कृषी विभागाला आदेश देत बियाणांचा काळाबाजार (Prohibited Seeds) करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. हे आदेश देऊन अवघे काही तास होत नाहीत तर कृषी विभागाने मोठी कारवाई करत बोगस बियाणांचे गुजरात कनेक्शन उघड केले आहे. या कारवाईत लाखोंच्या बनावट बीटी बियाणांसह सहाजणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 


लाखोंच्या बनावट बीटी बियाणांसह सहाजणांवर गुन्हे दाखल


प्रतिबंधित असलेली बोगस बियाणे विक्रीकरिता यवतमाळ जिल्ह्यात आले असल्याची गोपनीय माहिती पोलीस आणि कृषी विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस आणि कृषी विभागाने  सापळा रचून धडक कारवाई केली. यात तब्बल 6 लाख 30 हजारांचे 350 पॅकेट दारव्हा तालुक्यातील दारव्हा-दिग्रस रोडवर जप्त केले. तर वाहन आणि मोबाईल असे एकूण 16 लाखांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवाजी सिताराम आडे, नरेंद्र तुळशिराम राठोड, हिरासिंग गणेश राठोड , अवधुत मारोती जाधव , नितीन गोपीचंद पवार , मोहन कनिराम राठोड या संशयित आरोपीना अटक केलीय. 


बोगस बियाणांचे गुजरात कनेक्शन उघड


या प्रतिबंधित बियाण्यांचे गुजरात राज्यातील मैसाना जिल्ह्यातील भाऊपुरा, ताडी येथील नरेंद्र उर्फ मंगल भाई पटेल यांच्याकडून आल्याची कबुली या प्रकरणातील संशयित आरोपीने दिली आहे. बुलंदी कॉटन हायब्रीड सिड्स, एके 47 कॉटन हायब्रीड सिड्स, एके 56 कॉटन हायब्रीड सिड्स, त्रिनेत्र अनमोल कॉटन हायब्रीड सिड्स, त्रिनेत्र शिवा कॉटन हायब्रीड सिड्सचे 350 पाकीटे अशी लाखोंची बनावट बीटी बियाणे आढळून आली आहे. या प्रकरणी दारव्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सध्या सुरू आहे. तर दुसरीकडे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता बोगस बियाणांचा देखील सामना करावा लगत असल्याचे चित्र आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या