Yavatmal News यवतमाळ : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत. अशातच राज्यात बोगस बियाणांचा (Prohibited Seeds) सुळसुळाट असल्याचे देखील बघायला मिळाले आहे. नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना खते, बियाणे उपलब्ध करून देण्यासह बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. असे असतांना खरीप हंगामाच्या तोंडावर यवतमाळ (Yavatmal News) जिल्ह्यात बियाणांचा काळाबाजार सुरूच असल्याचे चित्र आहे.
एकीकडे प्रशासकीय यंत्रणा बोगस बियाणांचा काळाबाजार प्रकरणी सतर्क झाली असतांना यवतमाळच्या 16 तालुक्यात ज्यादा दराने कापशीच्या बियाणांची विक्री होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बियाणांचा काळाबाजार रोखण्याचे पोलीस आणि कृषी विभागापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
कापशी बियाणांच्या विक्रेत्यांकडून काळाबाजार
खरीप हंगामाची तयारी म्हणून शेतकरी वर्गाकडून बी-बियाणे, रासायनिक खते घेण्यासाठी धावपळ सुरू आहे. परंतु बहुतांश कृषी केंद्रांतून मागणी असलेले कपाशी वाण तुटवड्याचे कारण दाखवून जादा भावाने विकले जात आहे. या प्रकाराकडे कृषी अधिकाऱ्यांची डोळझाक पणाची भूमिका घेत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामागील कारण म्हणजे, 864 रुपयांची बैंग 1300 ते 1500 हजारांपर्यंत गेली असून, काही ठिकाणी शेतकऱ्यांना बिल मात्र 864 रुपयांचे दिले जात असल्याचे चित्र आहे.
कपाशीचे तुलसी कंपनीचे कबड्डी, पंगा, अजित 155, अजित 05, ऍग्रिसिड 7076, राशी सिड्स 659, राशी सिड्स 779, स्विफ्ट, प्रवर्धन सीडलेस एक्स, प्रवर्धन रेवंत या सर्व बियाणांची कृत्रिम तुटवडा भासविण्यात येत आहे. या गंभीर बाबीकडे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत असून, शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबवावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून केली जात आहे.
शेतकरी मशागतीनंतर लागवडीच्या प्रतीक्षेत
ऐन उन्हाळ्यात जिल्ह्यात मान्सूनपूर्व अवकाळी आणि वादळी पावसाने अनेकदा हजेरी लावली. त्यामुळे जमीन ओलसर असल्याने शेतकऱ्यांना उन्हाळवाईची मशागत करण्यास शेतकऱ्यांना सोपे गेले. मशागतीची कामे आटोपली असून काही भागात तर जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी लागवडीस सुरुवात केली. ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवडही केली. शेतकऱ्यांनी बियाणे, खते खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार आठवड्याभरात जोरदार पाऊस झाल्यास शेतकरी लागवडीच्या कामाला लागणार आहे. यावर्षी एकट्या यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामात 9 लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन आहे. त्यात कापूस सर्वाधिक 4 लाख 57 हजार हेक्टरवर त्यापाठोपाठ सोयाबीन 2 लाख 94 हजार तर तूर 1 लाख 15 हजार हेक्टर लागवडीचे नियोजन आहे. खरीप हंगामासाठी जिल्ह्याला 2 लाख 54 हजार 450 मेट्रीक टन इतक्या विविध प्रकारच्या खतांची आवश्यकता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या