वाशिम : बिटकॉईनच्या व्यवहारातून अनेकांची फसवणूक झाल्याचं आपण ऐकलं असेल. मात्र बिटकॉईनच्या व्यवहारातून हत्या झाल्याचा प्रकार कधीही ऐकला नसेल. पण हा धक्कादायक प्रकार वाशिममध्ये घडल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे तर इतर चार जण फरार आहेत.
या हत्येप्रकरणी वाशिम पोलिसांनी अट्टल गुन्हेगार विक्की उर्फ विकल्प मोहोड, शुभम उर्फ लाला कन्हारकार आणि व्यंकेश उर्फ टोनी मिसन भगत या तिघांना अटक केली आहे. अट्टल गुन्हेगारी प्रवृत्तीच्या या युवकांनी वाशिमच्या मालेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत 12 सप्टेंबरला नागपूर- औरंगाबाद मार्गावर असलेल्या पांगरी कुटे गावाजवळील शेत शिवारात नागपूरच्या माधव पवार या युवकाची बंदुकीच्या गोळ्या घालून खून केला. मात्र हा खून का केला असा प्रश्न पडला असेल तर हा खून बिटकॉईन च्या व्यवहारातून घडला आहे
नागपूर मध्ये मुख्य आरोपी निशिद वासनिक हा एथर ट्रेंड आशियाच्या नावे बिटकॉईनचा व्यवसाय करायचा. यामध्ये माधव पवार बिटकॉईनच्या व्यवसायात लोकांनी गुंतवणूक कशी करावी, म्हणून सेमिनार आयोजित करत होता. तसेच व्यवसायाचा हिशोबही ठेवत होता. व्यवसायाच्या बिटकॉईनच्या पैशांची हेरफेर आणि हव्या असलेल्या मोबाईलच्या वादातून आरोपींनी माधव पवारचे नागपूर येथून घरातून अपहरण केले होते. त्यानंतर त्याला वाशिममध्ये रस्त्याच्या बाजूला निर्जनस्थळी उतरवून ठार केले. मुख्य आरोपी निशिद वासनिक याने गोळ्या झाडल्या आणि त्याला ठार मारले असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.
या घटनेतील बहुतांश आरोपी हे गुन्हेगार प्रवृत्तीचे आहे. या पूर्वी नागपूर परिसरात 500 कोटीच्या वर बिटकॉईनच्या माध्यमातून फसवणूक केल्याचं गुन्हे दाखल आहे. या प्रकरणी निशिद महादेव वासनिक, (मुख्य आरोपी), गज्जू उर्फ गजानन मुनगुने आणि एक अनोळखी महिला फरार आहेत.
बिटकॉइन म्हणजे काय ?
बिटकॉईन ही एक प्रकारची क्रिप्टोकरन्सी आहे. बिटकॉईन हे रुपया, डॉलर किंवा इतर कुठल्याही चलनाप्रमाणे एक चलन असतं. फक्त ते ऑनलाईन असतं आणि एका काँप्युटर कोडद्वारे एनक्रिप्टेड म्हणजे लॉक केलेलं असतं. जस की आपल्याला बँकांमधून नोटा मिळतात तसंच इथंही ऑनलाईन साईट्सवर हे चलन तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या पैशातून खरेदी करता येतं. ही खरेदी केल्यावर तुमचं एक वॉलेट तयार होतं, ज्यात ही करन्सी तुम्ही साठवू ठेवू शकता.
संबंधित बातम्या :
- Maharashtra Corona Update : राज्यात आज 3, 391 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 3 हजार 841 रुग्ण कोरोनामुक्त
- Amarinder Singh On Sidhu : कुणीही चालेल पण सिद्धू मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल तर विरोध करणार : कॅप्टन अमरिंदर सिंह
- Mumbai Corona Update : मुंबईत गेल्या 24 तासात 485 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; तर 432 रुग्ण कोरोनामुक्त