Washim Crime News वाशिम : समाजात हुंडाबळीचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. शासन दरबारी या संबंधित कठोर कायदा असून देखील आजही काही ठिकाणी मुलींचा हुंड्यासाठी छळ केला जात आहे. अशीच एक दुर्दैवी घटना वाशिमच्या (Washim) वाघजाळी गावात घडली आहे. मेघा शिंदे या नवविवाहितेची हुंड्यासाठी (Dowery) तिच्याच पतीने गळा चिरून हत्या(Crime) केलाचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.


चारचाकीसाठी पैसे आणण्याचा तगादा


काही महिन्याअगोदर चिखली बु. गावातील मेघा शिंदे (Megha Shinde) या तरुणीचा विवाह वाघजाळी येथील गजानन शिंदे (Gajanan Shinde) या तरुणाशी झाला होता. मात्र लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी मेघाच्या माहेरून चारचाकी गाडीसाठी पैसे आणण्यासाठी पतीने तगादा लावला. तसेच मेघाचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. त्यानंतर मेघा आणि तिच्या सासरच्या कुटुंबियांमध्ये कायम वाद होत राहिला. मेघा ही आपल्या पती, सासू, सासऱ्यासह शेतात गेली असता तिथ पुन्हा त्यांच्यात पैशांवरून वाद झाला. सासू, सासरे आणि पती यांनी मिळून मेघाची गळा चिरत हत्या केल्याची माहिती मिळत आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. घटनेनंतर पती गजानन शिंदे याने देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.  सध्या त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.


अधिक पैशांच्या मागणीसाठी सासरकडून छळ


पती गजानन शिंदे, सासरे बबन श्यामराव शिंदे, सासू पार्वती बबन शिंदे (रा. वाघजाळी) यांनी लग्नानंतर चारचाकी वाहन घेण्यासाठी मेघाच्या वडिलांकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. मेघाच्या माहेरच्यांनी काही पैसे धनादेशाद्वारे दिले. मात्र, आणखी रक्कम हवी म्हणून अधिक छळ सासरच्यांनी केला. शनिवारी 27 जानेवारीला मेघा ही पती, सासू, सासऱ्यासह शेतात गेली असता तिथे पुन्हा यांच्यात पैशांवरून वाद झाला. सासू, सासरे आणि पती यांनी मिळून मेघावर चाकूने वार केला. त्यानंतर जखमी अवस्थेत मेघाला वाशिमच्या खाजगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, अतिरक्त रक्तस्त्राव झाल्याने मेघाची प्राणजोत मावळली.


मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल 


या प्रकरणी मेघाच्या माहेरच्या कुटुंबीयांनी वाशीम ग्रामीण पोलिसात (Washim Police) तक्रार दिली असून या प्रकरणी पती, सासू आणि सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिता इंगोले करत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या