नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) नाशिक जिल्ह्यात (Nashik News) मोठी कारवाई केली आहे. एकाच दिवशी तीन लाचखोरांना पकडण्यात एसीबीला यश आले असून यात महावितरण उपअभियंता, अव्वल कारकून आणि गटविकास अधिकाऱ्याचा समावेश आहे. नाशकात एकाच दिवशी तीन कारवाया झाल्याने भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. 


गटविकास अधिकारी 20 हजारांची लाच घेताना जाळ्यात 


लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने येवला पंचायत गटविकास शहरातील समितीचे अधिकारी मच्छिंद्रनाथ धस यांना वीस हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. तक्रारदार यांचे ग्रामपंचायत हद्दीतील वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनांतर्गत 2022-2023 करिता प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या ग्रामपंचायतीतील वस्तीवर ठेकेदारामार्फत झालेले विकासकामाचे बिल मंजूर करण्यासाठी चेकवर सही करून घेण्यासाठी मूल्यांकन बिलाच्या दोन टक्के या प्रमाणे 20 हजार रुपयांची पंचासमक्ष लाचेची मागणी करून स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध येवला शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधिक्षक शर्मिला घारगे वालावलकर, अप्पर पोलीस अधिक्षक माधव रेड्डी, याच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी निलिमा केशव डोळस पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ह. गांगुर्डे, पोलीस नाईक संदीप हांडगे, पोलीस शिपाई सुरेश चव्हाण आदीच्या पथकाने कारवाई करण्यात आली आहे.


लाच घेताना अव्वल कारकून अटकेत


भूसंपादनाचा ना हरकत दाखला देण्यासाठी सातशे रुपयांची लाच स्वीकारताना येवला येथील अव्वल कारकून जनार्दन भानुदास रहाटळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. तक्रारदार यांचे चुलत चुलते यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय येवला येथे भूसंपादनाचा ना हरकत दाखला मिळण्यासाठी अर्ज सादर केला होता. दाखला देण्याच्या मोबदल्यात जनार्दन रहाटळ यांनी दि. 3 जुलै रोजी अकराशे रुपयांची मागणी केली. शंभर रुपये स्वीकारून उर्वरित हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्याशी संपर्क साधला असता पडताळणी कारवाई दरम्यान रहाटळ यांनी तडजोडीअंती 700 रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले. लाचेची रक्कम उपविभागीय अधिकारी कार्यालय येवला येथे स्वीकारल्याने त्यांच्याविरुद्ध येवला पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. 


महावितरणचा उपअभियंता एक लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ 


तब्बल एक लाख रुपयांची लाच घेताना महावितरण विभागाचा उपकार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल रंगेहाथ पकडले. किसन भीमराव कोपनर असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून, पिंपळगाव बसवंत येथे ते कार्यरत होते.दुकानाचे व्यावसायिक मीटर कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबवत त्या ठिकाणी इंडस्ट्रीज इलेक्ट्रिक मीटर बसवून देण्यासाठी 1 लाख रुपये मागितले होते. लाचलुचपत विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप घुगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. पिंपळगाव बसवंत येथील पोलीस ठाण्यात या प्रकरणी लाचखोर उपकार्यकारी अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आणखी वाचा 


Nashik Crime : घरात घुसून 18 वर्षीय तरुणाला संपवलं, शेजारी झोपलेल्या भावालाही समजलं नाही, नाशिक पुन्हा हादरलं!