Crime News : मुसळधार पावसात रात्रीच्या वेळी ज्वेलर्समध्ये चोरी करणाऱ्या एका चोराला नागरिकांनी बेदम मारहाण केली असल्याची घटना समोर आली आहे. वसई पूर्व येथील गौराई पाडा साईनगरातील ज्वेलर्सच्या दुकानात चोरीचा प्रयत्न या चोराने केला होता. मात्र, काही सजग नागरिकांनी चोरीचा डाव हाणून पाडला. 


वसई पूर्वेतील गौराई पाडा परिसरातील साईनगर भागात यास्मिन ज्वेलर्स आहे. या ज्वेलर्समध्ये रात्री तीन वाजण्याच्या सुमारास या चोराने दुकानावरील पत्रे तोडले आणि दुकानात प्रवेश केला. काही तरी तुटल्याचा आवाज आल्याने आजूबाजूचे नागरीक सावध झाले. त्याच दरम्यान त्यांनी एकमेकांना फोन केले. त्यानंतर काहीजण ज्वेलर्सजवळ जमले. त्यानंतर त्यांनी या चोराला चोरी करताना रंगेहात पकडले. चोराला पकडल्यानंतर जमलेल्या जमावाने त्याला बेदम मारहाण केली.
 
नागरिकांच्या सतर्कतेमुळे दुकानात कोणत्याही प्रकारची चोरी झाली नाही. नागरिकांनी एक तास चोराला पकडून ठेवले होते. चोराला चोरी करताना पकडले असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर एक तासानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हा चोर अल्पवयीन असून 17 वर्षांचा असल्याची माहिती आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे. चोराला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे. त्याने इतर ठिकाणी याआधी चोरी केली आहे का, चोरीत सहभाग होता का, आदींचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. स्थानिक पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.


रात्रभर पाऊस पडत असताना या पावसाचा फायदा घेत भरपावसात चोरी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातील एक घटना वसईत समोर आली. मात्र, या निमित्ताने नागरिकांनी पोलिसांच्या गस्तीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या: