Kanpur Crime News : एक विश्वासघाती मित्र, शंभर शत्रूंच्या बरोबरीचा असतो, हे आपण ऐकलं आहे. पण, याचा प्रत्यय उत्तर प्रदेशातील एका तरुणीला आला आहे. एका तरुणीने तिच्याच मैत्रिणीचं लग्न मोडण्याचा कट रचला. यासाठी तरुणीने नवरीचे आक्षेपार्ह फोटो नवरदेवाला पाठवले. तरुणीने नवरीचे फोटो एडिट करुन नवरदेवाला पाठवल्याची धक्कादायक घटना कानपूरमध्ये घडली आहे. तरुणीने नवरीचे एडिट केलेले आक्षेपार्ह फोटो नवरदेवाला पाठवले, मात्र नवरदेवाने या फोटोवर विश्वास ठेवला नाही आणि याबाबत नवरीला माहिती दिली. यानंतर दोघांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली.


मैत्रिणीनेचं घातला लग्न मोडण्याचा घाट


कानपूरच्या बादशाही नाका परिसरातील ही घटना समोर आली आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर तपासामध्ये धक्कादायक बाब समोर आली. नवरदेवाला आक्षेपार्ह फोटो पाठवणारी व्यक्ती नववधूची मैत्रिण होती, यामुळे सर्वांनाच धक्का बसला. नववधूने लग्नाचं निमंत्रण दिलेल्या मैत्रिणीने नवरदेवाला आक्षेपार्ह फोटो पाठवून लग्न मोडण्याचा घाट घातला होता. पोलीस याप्रकरणात तरुणीवर कारवाई करणार होते. पण, नवरीने तिच्या मैत्रिणीला माफ केलं. पण, तरुणीने मैत्रिणीचंच लग्न मोडण्यासाठी एवढा थराला जाण्याचं नेमकं कारण काय?


नवरदेवाला नवरीचे आक्षेपार्ह फोटो पाठवले


बादशाही नाका परिसरात राहणाऱ्या दोन तरुणी पदवी महाविद्यालयात शिक्षण घेत होत्या. दोघींमध्ये चांगली मैत्री होती. दीड महिन्यांपूर्वी एका तरुणीचं लग्न ठरलं. साखरपुड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात तरुणीने तिच्या मैत्रिणीलाही बोलावलं. या कार्यक्रमादरम्यान मैत्रिणीने नववधूचे अनेक फोटो काढले. पण, या फोटोंसोबत ती काय करणार आहे, याची कुणालाही कल्पना नव्हती.


मैत्रिणीचे फोटो अश्लीलरित्या एडिट केले


साखरपुड्याच्या एक-दोन दिवसानंतर होणाऱ्या नवरदेवाला व्हॉट्सअॅपवर एका अनोळखी नंबरवरून होणाऱ्या नववधूचे अश्लील फोटो पाठवण्यात आले. फोटो पाहिल्यानंतर नवरदेवाला धक्का बसला. त्याने लगेचच नववधूला याबद्दल माहिती दिली. नववधूने याबाबत कोणतीही माहिती नसल्याचं सांगितलं. या दोघांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. 


असं करण्यामागचं नेमकं कारण काय?


या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. दीड महिन्यानंतर पोलिसांना फोटो पाठवण्यात आलेला मोबाईल क्रमांक तरुणीचा असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी लगेच संबंधित तरुणीची चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान तरुणीने सांगितलं की, तिला तिच्या मैत्रिणीचं लग्न होऊ द्यायचं नव्हतं. त्यामुळे, तिने मैत्रिणीचे फोटो एडिट करुन ते अश्लील केले. मग होणाऱ्या नवरदेवाला पाठवले. यामुळे लग्न मोडेल, असं या तरुणीला वाटलं. मैत्रिणच गुन्हेगार असल्याचं समजताच नववधूच्या पायाखालची जमीनच सरकरली. तिला विश्वासच बसत नव्हता की, तिची मैत्रिण असं काही करु शकते. दरम्यान, तरुणीचं भविष्य खराब होऊ नये, यासाठी नववधूने मैत्रिणीला माफ केलं आणि एफआयआर मागे घेतली. दरम्यान, तरुणीने इर्षेतून मैत्रिणीचं लग्न मोडण्यासाठी हे सर्व केल्याचं समोर आलं आहे.