Ulhasnagar Latest Crime News : उल्हासनगरचे हॉटेल व्यावसायिक आसन बालानी यांनी त्यांच्या आणि पत्नीच्या नावावर काढलेल्या बजाज अलायन्स जीवन विमा पॉलिसीमध्ये लाखो रुपये जमा होते. रिलेशनशिप मॅनेजर, ब्रँच मॅनेजर आणि कर्मचारी यांनी बनावट सह्या करून जमा रक्कमेतून नवीन पॉलिसी तयार करत बालानी यांची फसवणूक केल्याचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या पथकाने एका महिलेसह दोन जणांना अटक केली आहे. 


आसन बालानी यांनी स्वत:साठी आणि पत्नी पूजा बालानी यांची बजाज अलायन्स ह्या जीवन विमा कंपनीची उल्हासनगर शाखेमध्ये वर्षाला प्रत्येकी एक लाखांचा हप्ता असलेला जीवन विमा 2010 मध्ये काढला होता. 2030 मध्ये या जीवन विम्याचे हप्ते पूर्ण होऊन त्याद्वारे बालानी यांना प्रत्येकी 46 लाख 61 हजार रुपये मिळणार होते. मार्च महिन्यात बजाज अलायान्स कंपनीची एक कर्मचारी आसन बालानी यांच्या घरी आली. त्यांनी पूजा बालानी यांचा एक फोटो मोबाईलमध्ये काढला. तसेच केवायसी अपडेट करीत असल्याचे सांगत ओटीपी घेतला. त्यानंतर आसन बालानी यांनी तिला कार्यालयात भेटण्यास बोलावले. तेव्हा ह्या महिलेने आसन बालानी यांना त्यांच्या विम्यात नुकसान होत असून दुप्पट फायदा हवा असल्यास जुना जीवन विमा तोडण्याची मागणी केली. त्याला आसन यांनी विरोध केला, असे असतानाही त्या दिवशी तिने जुनी विमा पॉलिसी तोडून नवीन जिवन विमा काढला. पूजा बालानी यांनी विरोध करताच जुनी पॉलिसी कंपनीने रद्द केली. त्यानंतर तात्काळ आसन बालानी यांनी त्यांची पॉलिसी तपासली असता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. 2020 मध्ये संगणकाच्या सिस्टीममधून आसन बालानी यांचा मोबाईल नंबर काढून त्यात मिनू झा यांचा मोबाईल नंबर टाकलेला होता. तसेच फोटो ही बदललेला होता. त्यानंतर वर्षाला चार लाख रुपयांचा हप्ता असलेले दोन नवीन जीवन विमा काढले होते. त्याच्या हप्त्याचे पैसे जुन्या जीवन विम्याच्या जमा रक्कम मधून वळते केले होते.


हा प्रकार आसन बालानी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ही बाब कंपनीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आसन बालानी यांनी लेखी तक्रार केली होती. पोलीस उपायुक्त प्रशांत मोहीते, सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर सुहास आव्हाड, दत्तू जाधव, संदीप शिरसाठ, दीपक पाटील, बाबासाहेब ढेकणे या पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरु केला. या घटनेची चौकशी केल्यानंतर मध्यवर्ती पोलिसांनी तीन जणांच्या विरोधात 46 लाख 61 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान या प्रकरणाचा तपास करत असताना पोलीसांनी आरोपी मिनू झा ( आसनगाव ) या महिलेसह विकास गोंड ( कल्याण ) आणि अनुज मढवी ( ठाणे ) या तीन जणांना अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.