Ulhasnagar Crime News : उल्हासनगर महापालिकेचे नगरसेवक विजय चाहू पाटील यांच्यावर एका व्यापाऱ्याला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आपल्यावरील आरोप हे राजकीय सुडापोटी करण्यात आल्याचं स्पष्टीकरण पाटील यांनी दिले आहे. तसेच भाजपवर आरोपही केले आहेत.


विजय चाहू पाटील हे उल्हासनगर महापालिकेचे भाजप नगरसेवक आहेत. शुक्रवारी 11 फेब्रुवारी रोजी एका व्यापाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. उल्हासनगरच्या कॅम्प 5 ओटी सेक्शनमध्ये व्यापारी नाणिक उर्फ बाबू वाधवा यांचं दुकान आहे. याच दुकानासमोर मोहन नावाच्या इसमानं वडापावची गाडी लावायला सुरुवात केली होती. मात्र व्यापारी नाणिक उर्फ बाबू वाधवा याचा या गाडीला विरोध होता. त्यामुळं 10 फेब्रुवारी रोजी त्यानं या गाडीवाल्याला गाडी लावण्यास मनाई केली होती. त्यामुळं गाडीवाल्यानं नगरसेवक विजय पाटील यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर 11 फेब्रुवारी रोजी गाडीवाल्याला पुन्हा गाडी लावण्यास मनाई करण्यात आल्यानं त्यानं विजय पाटील यांना याची माहिती दिली. त्यानंतर विजय पाटील हे कार्यकर्त्यांसह तिथे आले आणि आपल्याला मारहाण केली, असा आरोप व्यापारी नाणिक उर्फ बाबू वाधवा यानं केला. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात विजय पाटील यांच्यासह त्यांचा चालक आणि अन्य एका कार्यकर्त्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती हिल्लईं पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्र यांनी दिली आहे.


दरम्यान, या आरोपांबाबत आम्ही नगरसेवक विजय पाटील यांचीही बाजू जाणून घेतली. विजय पाटील यांच्या म्हणण्यानुसार हे आरोप निव्वळ राजकीय सुडापोटी करण्यात आले आहेत. विजय पाटील हे मागील निवडणुकीत भाजपकडून निवडून आले होते. मात्र आता त्यांची शिवसेनेशी जवळीक वाढली असून फक्त पक्षप्रवेशाची औपचारिकता बाकी राहिली आहे. यातूनच भाजप पदाधिकारी आपल्याला टार्गेट करून राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विजय पाटील यांनी केलाय.


 उल्हासनगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक येत्या काही दिवसात लागण्याची चिन्हं आहेत. त्यामुळं शहरात शह काटशहाचं राजकारण, आरोप-प्रत्यारोप यांना सुरुवात झालीये. त्यामुळं या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा हे प्रकार सुरूच राहिल्यास येत्या काळात पोलिसांचं काम मात्र वाढणार आहे.