भिवंडी : चोरीच्या संशयावरून पालघरमध्ये तीन साधूंची जमावाकडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. भिवंडीत देखील काही दिवसांपासून असेच प्रकार घडत असल्याचं समोर येत आहे. भिवंडी शहरात बाळ चोरीच्या संशयावरून जमावाने वेगवेगळ्या ठिकाणी दोन महिलांना पकडून बेदम मारहाण केली. तसेच या मारहाणीचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे.


एका महिलेला तर अर्धनग्न करुन एका विजेच्या खांबाला बांधून मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ही बाब जेव्हा स्थानिक पोलिसांच्या लक्षात आली त्यावेळी पोलिसांनी यासंदर्भात गुन्ह्याची नोंद करत आता आपली तपासाची सूत्र हरवली आहे. या व्हिडिओमध्ये मारहाण करणाऱ्यांचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.


बिडीच्या थोटकावरुन धुळे पोलिसांनी केला दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश


भिवंडी शहरात मागील काही दिवसांपासून लहान मुलं चोरणारी गँग शहरात फिरत असल्याची अफवा पसरत असल्याने शहरांमध्ये महिलांना पकडून त्यांना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. शांती नगर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत दोन वेगवेगळ्या ठिकाणी लहान मुल चोरीच्या संशयावरून दोन भीक मागणाऱ्या महिलांना पकडून त्यांना बेदम मारहाण करीत भररस्त्यात फिरवल्याचा प्रकार समोर आलाय. तसेच एका घटनेत तर महिलेला अर्धनग्न करून खांबाला बांधून मारहाण केल्याचा प्रकार घडला असून या मारहाणीचा संपूर्ण चित्रीकरण जमावाकडून करण्यात आलं आहे व हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेची माहिती शांतीनगर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची नोंद करत या दोन्ही महिलांना आपल्या ताब्यात घेत त्यांची महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.


तर दुसरीकडे पोलीस प्रशासनाने मारहाणीच्या व्हिडिओवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करत मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच परिसरात पोलिस प्रशासनाच्या वतीने लाऊडस्पीकरच्या साहाय्याने अफवांवर विश्वास ठेवून कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.