नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलनात फूट पडली आहे. भारतीय किसान युनियन आणि राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेनं शेतकरी आंदोलनातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर गंभीर टीका करत शेतकरी नेते व्ही. एम. सिंह यांनी शेतकरी आंदोलनातून माघार घेण्याची घोषणा केली आहे.


भारतीय किसान युनियनचे (भानु) राष्ट्रीय अध्यक्ष भानू प्रताप सिंह यांनी शेतकरी आंदोलनातून वेगळं होण्याची घोषणा केली आहे. काल दिल्लीतील घटनेने मला खूप वाईट वाटले आहे. त्यामुळे मी हे आंदोलन संपवत असल्याचं जाहीर करत आहे, असं भानू प्रताप सिंह यांनी म्हटलं.


व्हीएम सिंह यांची राकेश टिकैत यांच्यावर टीका


राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे नेते व्हीएम सिंह यांनी म्हटलं की, आम्ही शेतकर्‍यांच्या मागण्यांसह हे आंदोलन सुरू केले होतं. परंतु आता त्याचे स्वरूप बदलले आहे. म्हणूनच आता आम्ही या लोकांना पाठिंबा देऊ इच्छित नाही. यावेळी व्हीएम सिंग यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावरही हल्ला केला.


व्ही. एम. सिंह यांनी म्हटलं की, त्यांनी सरकारसमोर शेतकऱ्यांच्या हिताचं काहीही केलं नाही. आम्ही फक्त समर्थन देत राहतो आणि कोणीतरी तिथे नेता होतो. हा आपला व्यवसाय नाही. मी मोठ्या व्यथितपणे सांगतो की आंदोलन उभं करणे हे व्हीएम सिंहचं काम होतं. देशाची प्रजासत्ताक दिनी बदनामी व्हावी यासाठी आम्ही येथे आलो नव्हतो. आम्हाला धान, ऊस दर, एमएसपीचा पूर्ण दर मिळावा यासाठी येथे आलो होतो.



अनेक बैठकांनंतर वेगळं होण्याचा निर्णय


आमचे सर्व साथीदार आज येथून निघून जातील. प्रत्येक भारतीयाला असा निर्णय घ्यावा लागेल शेतकरी आंदोलनाचं नुकसान होऊ नये आणि कुणाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत. माझ्या सहकाऱ्यांसोबत मी चार बैठका केल्या आहेत, त्यानंतर राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेने या आंदोलनातून माघार घेण्याचा निर्णय घेतला, असं व्ही.एम. सिंह यांनी सांगितलं. मला उत्तर प्रदेशातील शेतऱ्यांना सांगायचे आहे की, यंदाच्या वर्षापेक्षा पुढील वर्षी धान्याची विक्री दुप्पट होईल, म्हणून संघर्ष सुरूच राहणार आहे, असं ते म्हणाले.