धुळे: साक्री आणि शिंदखेडा तालुक्यातील दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटनास्थळी अर्धवट जळालेली बिडीची थोटकं आढळून आली होती. त्या बिडीच्या थोटकावरुन धुळे पोलिसांनी आपली तपासाची चक्रं फिरवली आणि घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. पोलिसांनी पकडलेल्या या आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे.


धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये धाडशी घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती. त्यातच साक्री तालुक्यात आणि शिंदखेडा तालुक्यात चोरीच्या मोठ्या घटना घडल्याने पोलिसांसमोरचे आव्हान वाढले होते.


साक्री तालुक्यातील पिंपळनेर सामोडे याठिकाणी एका घरामध्ये पहाटेच्या दरम्यान या चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवत घरातील सोने-चांदी त्याचबरोबर रोख रक्कम असा एकूण आठ लाख 87 हजारांचा मुद्देमाल चोरुन पोबारा केला होता. तसेच शिंदखेडा तालुक्यातील एका कंपनीमध्येही तब्बल 66 इलेक्ट्रॉनिक मोटारी या चोरट्यांनी चोरल्या होत्या. या प्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यामध्ये तसेच पिंपळनेर पोलिस ठाण्यामध्ये या दोनही चोरीची नोंद करण्यात आली होती.


सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मुंबईत पाच नवे सायबर पोलीस स्टेशन, कोणत्या तक्रारी नोंदवल्या जाणार?


पोलिस प्रशासनाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आपली तपासाची चक्र फिरवली असता या दोनही चोरीमध्ये पोलिसांना अर्धवट जळालेली बिडीची थोटकं आढळून आलीत. या बिडीच्या थोटकांवरुन पोलिसांनी एकाच टोळीने या दोन्ही चोर्‍या केल्या असल्याचा अंदाज बांधला व त्या अनुषंगाने आपला तपास सुरु केला.


पोलिसांना तपासादरम्यान घरफोड्या करणारी ही टोळी मध्यप्रदेश मधील असल्याचे समजले. लाल्या उर्फ रवी देविलाल फुलेरी या चोरट्याने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने या चोऱ्या केल्या असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर धुळे शहरातील शंभर फुटी रोड परिसरामध्ये लाल्या लपलेला असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून समजली. त्यानंतर जराही वेळ न दवडता पोलिसांनी अखेर या टोळीतील दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.


Delhi tractor rally violence: दिल्ली हिंसाचाराचा तपास क्राईम ब्रान्चचं विशेष पथक करणार, 22 गुन्हे दाखल


पकडण्यात आलेल्या या दोघांनी धुळे जिल्ह्यात पिंपळनेर सामोडे येथे बंदुकीचा धाक दाखवून घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. त्याचबरोबर शिंदखेडा येथील कंपनीमध्ये देखील 66 मोटारी चोरल्याचे पोलिसांना कबूल केले आहे. या दोघा चोरट्यांना ताब्यात घेतल्यानंतर आता त्यांची सखोल चौकशी पोलीस करीत आहेत.


परंतु एका बिडीच्या थोटका वरुन घरफोडी करणाऱ्या टोळीचा धुळे पोलिसांनी पर्दाफाश केल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपास अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे.


आता डोळ्यांना न दिसणाऱ्या शत्रू संगे आपलं युद्ध सुरु झालंय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे