Rape News of Hyderabad and Goa : तेलंगाणाची राजधानी हैदराबाद येथील सामुहिक बलात्कार प्रकरण समोर येऊन नुकतेच काही दिवस झाले आहेत. त्यातच आता पुन्हा आणखी दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एक गुन्हा रामगोपालपेठ पोलीस ठाण्यात तर दुसरा गुन्हा राजेंद्रनगर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.
रामगोपालपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक सैदुलु यांनी सांगितलं की, 'बालकल्याण समितीकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर 23 वर्षीय आरोपीनं अत्याचार केला आहे. आरोपीविरोधात पोक्सो कायदा आणि इतर कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.'
राजेंद्रनगर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, 'एका अल्पवयीन मुलीने तक्रार दाखल करत म्हटलं आहे की, एका महिन्यापूर्वी एका अल्पवयीन मुलाने पीडितेवर थिएटरमध्ये अत्याचार केला होता. पीडित मुलीकडून तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करत त्यांनी रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.'
'अल्पवयीन मुलांचे संरक्षण करण्यात पोलीस अपयशी'
हैदराबादमधील बलात्काराच्या घटनांवर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी म्हटलं आहे की, हैदराबादमधील घटना दुःखद आहे. अल्पवयीन मुलांना सुरक्षा देण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. या प्रकरणाची दखल घेत मी तेलंगणा पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं होतं. पोलिसांनी पहिल्या गुन्ह्यात 4 आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. आयोग इतर बाबींचीही दखल घेईल.
गोव्यातील आरंबोल समुद्रकिनारी ब्रिटीश महिलेवर अत्याचार
गोव्यातील अरंबोल समुद्रकिनाऱ्याजवळील प्रसिद्ध 'स्वीट लेक' येथे एका ब्रिटिश महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी एका 32 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपी जोएल व्हिन्सेंट डिसोझा स्थानिक रहिवासी असून त्याने 2 जून रोजी समुद्रकिनाऱ्यावर विश्रांती घेत असलेल्या एका मध्यमवयीन ब्रिटीश महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पतीसोबत गोव्यात फिरायला आलेल्या पीडित ब्रिटीश महिलेनं सोमवारी पोलिसांत तक्रार दाखल केली. आरोपीला अटक करण्यात आली असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार
हैदराबादमध्ये 28 मे रोजी एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये पाच आरोपींचा समावेश असून तीन आरोपी अल्पवयीन आहेत. तीन अल्पवयीन आणि एका आरोपीला अटक करण्यात आली असून पाचव्या फरार आरोपीचा शोध सुरु आहे.