Salman Khan : संगीतकार सिद्धू मुसेवाला (Sidhu Moosewala) यांच्या हत्येनंतर सलमान खानची (Salman Khan) सुरक्षा वाढवण्यात आली होती. सिद्धू मुसेवाला याच्या हत्येचा संबंध लॉरेन्स बिश्नोई टोळीशी होता. त्यामुळे सलमानच्या जीवालाही धोका असल्याचे सांगण्यात आले होते. सिद्धूच्या हत्येनंतर सहा दिवसांनी सलीम खान (Salim Khan) यांना धमकीचे पत्र मिळाले आहे. सलमान खानचे वडील सलीम खान हे रविवारी सकाळी जॉगिंगसाठी गेले होते. तिथे ते एका बेंचवर बसले असता, त्यांना एक पत्र मिळालं. ज्यामध्ये त्यांना आणि त्यांचा मुलगा सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
या पत्रात लिहिलं होत की, सलमान खान याचा सिद्धू मुसेवाला करून टाकू. सकाळी 7:30 ते 8:00च्या सुमारास सलीम खान यांना हे पत्र मिळाले होते. हे धमकीच पत्र मिळाल्यानंतर सलीम खान यांनी वांद्रे पोलीस स्थानकात एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणी आता सलमान खांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. मात्र, अशी जीवे मारण्याची धमकी मिळणार सलमान खान हा एकमेव बॉलिवूड कलाकार नाही. या आधीही अनेक कलाकारांना अशाच जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत.
राकेश रोशन : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याचे वडील आणि प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते राकेश रोशन यांना देखील जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यांच्यावर एकदा हल्लाही झाला होता. राकेश रोशन यांना खंडणीसाठी गँगस्टर अबू सालेमचे धमकीचे फोन यायचे. 'कहो ना प्यार है'च्या कमाईतून अंडरवर्ल्डने हिस्सा मागितला होता, जो राकेश रोशनने देण्यास नकार दिला होता. यानंतर अबू सालेमच्या गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला होता.
आमिर खान : आमिर खानचा ‘सत्यमेव जयते’ हा शो चांगलाच गाजला होता. या शोमधून त्याने अनेक सत्य समोर आणली. आमिर खानला या शोसाठी धमक्या आल्या होत्या. त्यानंतर अभिनेत्याने स्वत:साठी बुलेट प्रूफ कार घेतली.
कंगना रनौत : बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ अभिनेत्री कंगना रनौत हिला देखील अशाच धमक्या देण्यात आल्या होत्या. 2007मध्ये कंगनाची बहिण रांगोली चंदेलवर एका मुलाने अॅसिड फेकले होते. यानंतर कंगनाने या मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर ही तक्रार मागे घेण्यासाठी अभिनेत्रीला सतत धमकावण्यात येत होते.
महेश भट्ट : अभिनेत्री आलिया भट्ट आणि तिचे वडील-दिग्दर्शक महेश भट्ट यांनाही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. 2015मध्ये डी गँगने निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर 2017 मध्येही महेश भट्ट यांच्याकडून 50 लाखांची खंडणी मागण्यात आली होती.
शाहरुख खान : शाहरुख खानलाही अंडरवर्ल्डकडून धमक्या आल्या होत्या. गँगस्टर छोटा राजनसोबत रवी पुजारीनेही त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. 2014मध्ये त्याच्या 'हॅपी न्यू इयर' चित्रपटाच्या सेटवर एक नोट सापडली होती, ज्यामध्ये शाहरुखला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
संबंधित बातम्या :