Mumbai Bike Theft Case : मुंबईतील समतानगर पोलिसांनी बाईक चोर भावोजी आणि मेहुण्याला अटक केली आहे. त्यांच्याकडून नऊ बाईक जप्त करण्यात आल्या आहेत. समता नगर पोलिसांनी या भावोजी आणि मेहुण्याला दादरच्या स्वामी नारायण मंदिराबाहेरून अटक केली आहे. हे दोघे मुंबई भंडाऱ्यामध्ये जेवून बाईकची रेकी करायचे. त्यानंतर रात्री उशिरा मुंबईतून बाईक चोरायचे आणि या बाईक कमी किमतीला जालना आणि औरंगाबाद येथे नेऊन विकायचे. पोलिसांनी या जोडीला अटक केली असून त्यांच्याकडून 9 बाईक जप्त केल्या आहेत. 


पोलिसांनी या बाईक चोर भावोजी आणि मेहुण्याला अटक केली आहे. झोन 12 चे पोलिस उपायुक्त सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे आरोपी जालना जिल्ह्यातील देवलगावचे रहिवासी आहेत. या दोन आरोपींची नावं बाबासाहेब नाना खरात (वय 20) आणि शंकर माणिक मगरे (वय 26) अशी आहेत.


तक्रारदार देविदास गवळी यांच्या तक्रारीनंतर समता नगर पोलिसांनी तपास करत या दोघांना मुंबईतील दादर येथून गजाआड केलं आहे. तपासात समोर आलं आहे की, आरोपी मुंबईतून बाईक चोरून जालना आणि औरंगाबाद येथील गरीब शेतकऱ्यांना विकायचे. त्यानंतर जालन्यातून बाईक चोरून मुंबईत स्वस्त दरात विकायचे. हे दोघे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून बाईक चोरी करत दुसऱ्या ठिकाणी त्यांची विक्री करायचे.


हे दोघे मुंबईमध्ये कांदीवली हायवेवरील साईधाम मंदिरातील भंडाऱ्यात जेवायचे, त्यानंतर आजूबाजूच्या परिसरात उभ्या असलेल्या बाईकची रेकी करायचे. त्यानंतर बाईक चोरून जालना किंवा औरंगाबादला पळून तिथे कमी दरात बाईक विकायचे. साईधाम मंदिराबाहेरील सीसीटीव्हीमुळे पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या