नागपूरः मोठ्या भावाने आपल्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या छोट्या भावाच्या डोक्यावर जड वस्तूने वार करुन लहान भावाची हत्या केली. नागपुरातील वाठोडा पोलिस ठाण्याअंतर्गत श्रावण नगर परिसरात ही घटना घडली. चंद्रकांत पौनीकर (वय 30) असे हत्या झालेल्या तीस वर्षीय तरुणाचे नाव आहे. रोशन पौनीकर याला आपल्या भावाच्या खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली आहे.
चंद्रकांत आणि रोशन दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते. ते श्रावणनगर परिसरात आपल्या कुटुंबियांसोबत राहत होते. अनेक वर्षांपासून दोघांमध्ये सतत भांडण व्हायचे. मात्र मंगळवारी झालेल्या भांडणाचा अंत एका भावाच्या मृत्यूने झाला. प्राप्त माहितीनुसार मंगळवारी रात्री दारूच्या नशेत चंद्रकांत ने रोशनच्या पत्नी संदर्भात आक्षेपार्ह टिप्पणी केली. कौटुंबिक वादातून रोशनची पत्नी काही दिवसांपूर्वी त्याला सोडून निघून गेली होती. भांडणात चंद्रकांत ने 'तू आपल्या पत्नीला सांभाळू शकला नाही, आम्हाला काय सांभाळणार' असे म्हटले. त्यामुळे आधीच पत्नी सोडून गेल्यामुळे नैराश्यात असलेल्या रोशन ने रागाच्या भरात लहान भाऊ चंद्रकांतला शिवीगाळ करणे सुरू केले.
शाब्दिक भांडण मारामारी पर्यंत
काही वेळाने दोघांचे शाब्दिक भांडण मारामारी पर्यंत गेले. दोघांच्या भांडणाचा आवाज शेजाऱ्यांपर्यंत ही पोहोचला. शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. मात्र, पोलीस पोहोचण्याच्या आधीच दोघांच्या भांडणाचा आवाज शांत झाला होता. थोड्याच वेळानंतर रोशनच्या आईने बाहेर येऊन मोठ्या भावाने लहान भावाची डोक्यावर जड वस्तूचा प्रहार करून हत्या केल्याची माहिती शेजाऱ्यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चंद्रकांतला रुग्णालयात दाखल असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. भावाच्या हत्येच्या आरोपात पोलिसांनी रोशन पौनीकरला अटक केली आहे.
दोन्ही भावांचा भांडणाचा पूर्व इतिहास
विशेष म्हणजे दोन्ही भावांमध्ये भांडण होण्याचा अनेक वर्षांपासूनचा इतिहास आहे. 2008 मध्ये ही दोघांनी भांडणात एकमेकांचा हात मोडला होता. तर 2017 मध्ये ही दोघांमध्ये भांडण होऊन एकमेकांवर धारदार शस्त्रांनी हल्ले केले असल्याने दोघांवरही पोलिस ठाण्यात आधीच गुन्हे दाखल आहेत.