Torres Jewellery Scam: टोरेस कंपनीनं (Torres Jwellers गुंतवणूकदारांना मोठा धक्का दिला आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक करून टोरेस कंपनीचा (Torres Company) मालक फरार झाला आहे. महिन्याला 44 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून टोरेस कंपनीनं हजारो सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक केली आहे. या योजनेत 10 हजारांपासून तब्बल एक कोटी रुपयांपर्यंत लोकांनी गुंतवणूक केली होती. त्या सर्व नागरिकांचे अब्जावधी रुपये घेऊन टोरेसचे व्यवस्थापकीय अधिकारी पसार झाले आहेत. नवी मुंबई, भाईंदर आणि दादरमधील सर्व शाखांना टाळं लावून या कंपनीचा मालक फरार झालय. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच टोरेस कंपनीच्या सानपाड्यातील शाखेवर अज्ञातांनी दगडफेक केली. दादर आणि भाईंदरमधल्या टोरेस कंपनीच्या शाखांबाहेर मोठी गर्दी झाली होती. टोरेस कंपनीच्या गैरव्यवहारप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, 2023 मध्ये नोंदणीकृत 'प्लॅटिनम हरेन प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीनं 2024 मध्ये 'टोरेस' ब्रँड अंतर्गत दादरमध्ये 30 हजार स्क्वेअर फुटांचे आउटलेट उघडले. यानंतर कंपनीने मीरा-भाईंदरसह इतर ठिकाणी आऊटलेट्स उघडले.


'टोरेस'नं गुंतवणूकदारांना काय आश्वासन दिलं? 


कंपनीनं सोने, चांदी आणि मॉयसॅनाइट्स (लॅबनं तयार केलेले हिरे) खरेदीवर त्याच रकमेवर अनुक्रमे 48, 96 आणि 520 टक्क्यांचा ​​वार्षिक परतावा देण्याचं वचन दिलं. त्यानंतर गुंतवणूकदारांना दर आठवड्याला परतावा दिला जात होता. दोन आठवडे परताना न मिळाल्यानं गुंतवणूकदारांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं. 


हिऱ्यांऐवजी Moissanite खरेदीवर जोर 


कंपनी गुंतवणूकदारांना सोनं-चांदीऐवजी मॉयसॅनाइट खरेदी करण्याचा आग्रह धरत असे. त्यावर सर्वाधिक परतावा देखील देण्यात आला, जो साप्ताहिक 8 ते 11 टक्क्यांपर्यंत होता. कंपनीच्या वेबसाईटनुसार, प्लॅटिनम हरेन प्रायव्हेट लिमिटेडचे ​​नोंदणीकृत कार्यालय गिरगावातील ऑपेरा हाऊस इमारतीत आहे. इम्रान जावेद, सर्वेश सुर्वे आणि ओलेना स्टाइन, असे कंपनीचे तीन संचालक आहेत. तिन्ही संचालकांनी त्यांचा निवासस्थानाचा पत्ता कंपनीचा पत्ता म्हणून दाखवला आहे.


अब्जावधींचा घातला गंडा?


'टोरेस'च्या झटपट श्रीमंत होण्याच्या योजनेबाबत काही आठवड्यांपूर्वी पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल केल्याचं तरुण शर्मा यांनी सांगितलं होतं. त्याच्या ओळखीमुळे अनेकांनी लाखो, कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली. टोरेसमध्ये गुंतवणूक केलेल्या मोहम्मद आलमनं सांगितलं की, त्यानं अलिकडेच त्याच्या एका मित्राच्या सांगण्यावरुन 6 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. त्याच्या मित्रानंही नऊ लाख रुपये गुंतवले होते. त्याला दर आठवड्याला 48 हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण दोन आठवडे पैसे आले नाहीत, त्यानंतर गुंतवणूकदारांनी पोलिसांत धाव घेतली.  


मालक दुबईला फरार?


गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याचं आमिष दाखवून 'टोरेस'चा मालक रातो-रात शोरुमचं शटर बंद करुन फरार झाल्याची माहिती मिळत आहे. गुंतवणूकदारांना आपली फसवणूक झाल्याची माहिती मिळताच शेकडो गुंतवणूकदारांची गर्दी शोरूमच्या बाहेर जमली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकानं तपास सुरू केला. कंपनीचे मालक दुबईत असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. प्लानिंग करुन अब्जावधींचा गंडा घालून मालकांनी परदेशात पळ काढल्याचं बोललं जात आहे. 


दरम्यान, आठवड्याला 11 टक्के आणि महिन्याला 44 टक्क्यांपर्यंत परतावा देण्याच्या जाहिराती करूनही अशा बोगस कंपनींवर पोलीस यंत्रणा आणि सरकारनं वेळेत कारवाई केली असती, तर सर्वसामान्यांचे पैसे डुबले नसते, असा आरोप गुंतवणूकदारांनी केला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Torres Scam Mumbai: रविवारी पैसे गुंतवा, शुक्रवारपर्यंत घसघशीत रिटर्न्स; टोरेस कंपनीने मुंबईतील हजारो गुंतवणुकदारांना चुना कसा लावला?